आजपासून आदित्य ठाकरे यांचा शेतकरी संवाद दौरा

पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे हैराण झालेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आजपासून शेतकरी संवाद दौरा करणार आहेत. उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तर शनिवारी नाशिकमधील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा ते जाणून घेणार आहेत.

आदित्य ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगर जिह्यातील शेतकरी संवाद दौरा दुपारी साडेबारा वाजता पैठण तालुक्यातील निपाणी येथून सुरू होणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजून पाच मिनिटांनी लोहगाव, नंतर गंगापूर तालुक्यातील गुरूधानोरा येथे आदित्य ठाकरे हे शेतकऱ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी साडेचार वाजता गंगापूरच्या मुद्देश वाडगाव येथील शेतकऱ्यांची ते भेट घेणार आहेत.

शनिवारी नाशिक जिह्यातील निफाड तालुक्यातील भेंडाळी येथून आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला सकाळी साडेअकरा वाजता सुरुवात होईल. त्यानंतर साडेबारा वाजता सिन्नरच्या वडांगळी गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न ते जाणून घेणार आहेत. दुपारी पावणेतीन वाजता इगतपुरीच्या साकूर येथे त्यांचा शेतकऱ्यांशी संवाद होईल, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.