महायुतीच्या मेळाव्याला अजित पवारांसह नेत्यांची दांडी

महायुतीमधील भाऊगर्दीने लहान घटक पक्षांचा जीव टांगणीला लागला असून त्याचा प्रत्यय पुण्यातील मेळाव्यात आला. महायुतीकडून आयोजित जिल्हास्तरीय मेळाव्यात आरपीआयने तिघेच वाटून घ्याल, पण आम्हाला एखादे महामंडळ तरी द्यावे, असे सांगत थेट वाटाघाटीची मागणी केली. तर मेळाव्यापूर्वीच घटक पक्षांतील नेत्यांच्या फोटोंच्या स्थानावरून रुसवेफुगवे समोर आले असतानाच मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन करणारे जिह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक दांडी मारली.

पवारांसह कोथरूड विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील, पर्वतीच्या माधुरी मिसाळ, माजी खासदार संजय काकडे, लोकसभेला इच्छुक म्हणून चर्चा असलेले सुनील देवधर यांचीही अनुपस्थिती होती. दोन्हीकडेही वावर असलेले राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.