समीर, पंकज भुजबळ यांना दणका, आर्मस्ट्राँगवर जिल्हा बँकेकडून कर्जवसुलीसाठी कारवाई

मालेगावच्या दाभाडी येथील वादग्रस्त गिरणा सहकारी साखर कारखाना भुजबळ कुटुंबीयांच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने खरेदी केलेला आहे. या कारखान्याकडे असलेल्या 51 कोटी रुपये थकबाकीच्या वसुलीसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह तिघांना नोटीस बजावली आहे. कारखान्यावर जाऊन अधिकाऱयांनी नोटीस चिटकवली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भुजबळ कुटुंबीयांच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या पंपनीने सन 2010 मध्ये लिलावात दाभाडीचा गिरणा सहकारी साखर कारखाना विकत घेतला. आर्मस्ट्राँग साखर कारखान्याने जिल्हा बँकेकडून 10 नोव्हेंबर 2011 ला 30 कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली. बँकेने 3 जानेवारी 2012 ला त्यांना हे कर्ज मंजूर केले. त्यापैकी या कारखान्याने 18 कोटी रुपयांच्या नियमित कर्जाची परतफेड केली. सन 2013 पासून कारखान्याकडे बारा कोटी 12 लाख रुपये थकीत मुद्दल व 39 कोटी 54 लाख व्याज असे एकूण 51 कोटी 66 लाख रुपये थकीत आहेत. या वसुलीसाठी जिल्हा बँकेने कारखान्यावर सरफेसी कायद्याअंतर्गत कलम 13 (2) अंतर्गत कारवाई सुरू करून कर्जमागणीची नोटीस 10 जानेवारी 2024 रोजी दाभाडीतील कारखानास्थळावर चिटकविली. जिल्हा बँकेचे प्राधिकृत अधिकारी गोपीचंद निकम, गोरख जाधव यांच्यासह पेंद्र कार्यालयाकडील वरिष्ठ अधिकाऱयांनी ही कारवाई केली.

आर्मस्ट्राँग कारखान्याचे संचालक माजी आमदार पंकज छगन भुजबळ, माजी खासदार समीर मगन भुजबळ, तसेच संचालक सत्येन आप्पा केसरकर यांनाही नोटीस बजावली. जिल्हा बँकेची 31 मार्च 2023 ची आर्थिक परिस्थिती बघता गेल्या तीन वर्षांपासून बँकेची आर्थिक परिस्थिती पूर्णतः ढासळली असल्याने थकीत कर्जवसुलीसाठी बँकेने कडक पावले उचलली आहेत. बँक ऊर्जितावस्थेत येण्यासाठी थकीत कर्जदारांनी कर्ज भरावे, असे आवाहन बँकेने या नोटिसीतून केले आहे.