Ganeshotsav 2023 – गणेश भक्तांसाठी ‘बेस्ट’ सेवा रात्री अतिरिक्त गाडय़ा धावणार

गणेशोत्सव काळात रात्रभर बाप्पाच्या दर्शनासाठी फिरणाऱया भाविकांसाठी रात्रीही ‘बेस्ट’च्या गाडय़ा चालवण्यात येणार आहेत. गणेशोत्सवात भक्तांना मुंबईतील बाप्पाचे दर्शन योग्यरीत्या मिळावे यासाठी बेस्ट उपक्रमाने रात्री 12 ते पहाटे 6 वाजेपर्यंत अतिरिक्त बस सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होत असताना मंडळांकडून आकर्षक देखावे, भव्य मूर्ती साकारण्यात येतात. उंच उंच गणेश मूर्ती, आकर्षक देखावे पाहण्यासाठी भाविक रात्रीच्या वेळी मोठय़ा संख्येने घराबाहेर पडतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाने रात्री अतिरिक्त बसेस प्रवाशांच्या सेवेत चालवण्याचा निर्णय घेतल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. दिवसभर बेस्ट उपक्रमाच्या गाडय़ा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतात. बस प्रवर्तन तुरळक प्रमाणात असल्यामुळे बेस्ट उपक्रमातर्फे गणेशोत्सव कालावधीत रात्रौ अतिरिक्त बस गाडय़ांचे प्रवर्तन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. रात्री कुलाबा परिसरातून उत्तर-पश्चिम मुंबईकडे गिरगाव, लालबाग, परळ, चेंबूर मार्गे प्रवर्तित होणाऱया बस मार्ग क्र. 4 मर्या., 7 मर्या., 8 मर्या., ए-21, ए-42, 44, 66, 69 व सी-40 या बस मार्गांवर रात्रीच्या बसफेऱया कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.