शी जिनपिंगही G20 बैठकीला दांडी मागणार

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पुढील आठवड्यात भारतात होणाऱ्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेला दांडी मारण्याची शक्यता आहे. रॉयटर्सने हिंदुस्थान तसेच चीनमधील त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. दोन हिंदुस्थानी अधिकारी ज्यातील एक चीनमध्ये दूतावासात कामाला असून दुसरा जी20 सदस्य देशामध्ये काम करत असून या दोघांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. नवी दिल्ली मध्ये जी20 बैठक पार पडणार असून 9-10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या बैठकीसाठी शी जिनपिंगही येणार असल्याचे वृत्त आधी प्रसिद्ध करण्यात आले होते.

या वृत्तावर प्रतिक्रिया देण्यास हिंदुस्थानी आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ही बैठक महत्त्वाची मानली जात होती कारण या बैठकीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे एकमेकांना भेटण्याची शक्यता होती. या दोन राष्ट्रांमधील संबंध हे फारसे चांगले नसून ते सुधारण्यासाठी या बैठकीच्या निमित्ताने प्रयत्न होतील असे बोलले जात होते. या दोन नेत्यांमध्ये जी20 बैठकीच्याच निमित्ताने इंडोनेशियातील बाली येथे भेट झाली होती.रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी यापूर्वीच आपण या बैठकीला येणार नसल्याचं कळवलं आहे. त्यांच्याऐवजी त्यांचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह हे या बैठकीला येणार आहेत.