एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला विमानातच मारहाण, सिडनी-नवी दिल्ली फ्लाइटमधील घटना

एअर इंडियाच्या विमानामध्ये गैरव्यवहाराची आणखी एक घटना समोर आली आहे. विमान हजारो फूट हवेत उडत असताना एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला एका प्रवाशाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना 9 जुलै रोजी सिडनीहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइट क्रमांक एआय 301 मध्ये घडली होती. एअर इंडियाच्या विमानामध्ये यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.

प्रवाशाने विमान कंपनीच्या इनफ्लाइट सेवा विभागाचे प्रमुख संदीप वर्मा यांना मारहाण केली. याबाबतची माहिती डीजीसीएला देण्यात आल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे. दिल्लीत उतरल्यानंतर प्रवाशाला सुरक्षा एजन्सीच्या ताब्यात देण्यात आले. नंतर या प्रवाशाने लेखी माफी मागितली. सीटमधील बिघाडामुळे बिझनेस क्लासमधून इकॉनॉमी क्लासमध्ये आलेल्या एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने आपल्या सहप्रवाशाला मोठ्या आवाजात बोलत असल्याने अडवण्याचा प्रयत्न केला म्हणून ही घटना घडली.

अधिकाऱ्याला मारहाण करत असताना एअर इंडियाच्या क्रू मेम्बर्सने या प्रवाशाला आवर घालण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही असा आरोप करण्यात आला आहे. फ्लाइटमध्ये घडलेल्या या घटनेमुळे इतर प्रवाशांमध्ये मोठे भीतीचे वातावरण तयार झाले. एअरलाइन प्रवाशाच्या या गैरवर्तनाच्या विरोधात कठोर भूमिका घेईल, असे सांगण्यात आले आहे.

विमानात काय घडले?
एअर इंडियाच्या अधिकार्‍याला 30-सी सीट देण्यात आली होती पण आजूबाजूला इतर प्रवासी होते म्हणून त्यांनी सीट बदलण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांना 25 एबीसी ही जागा देण्यात आली. यावेळी या अधिकाऱ्याच्या बाजूला बसलेला सहप्रवासी मोठ्या आवाजात बोलत होता. यामुळे अधिकाऱ्याने या प्रवाशाला हळू आवाजात बोलण्यास सांगितले. मात्र याचा राग आल्याने शेजारी बसलेल्या प्रवाशाने अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली व शिवीगाळ केली. यानंतर केबिन सुपरवायझरने मध्यस्ती केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.