अजित पवारांवर सरकारच्या वर्षपूर्तीच्या ‘सुराज्या’चे प्रकाशन करण्याची वेळ

ajit-pawar-eknath-shinde

वर्षभर सरकारवर टीका आणि अधिवेशनाच्या काळात विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून ‘गुजरातचा निरमा, क्लीन चिट मिळवा’, ‘खोके सरकार हाय हाय’ अशा घोषणा देणारे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर आज सरकारच्या निर्णयाचे गोडवे गाणाऱ्या ‘पहिले वर्ष सुराज्याचे’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्याची वेळ आली.

विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी अधिवेशनाच्या काळात तर सरकारच्या निर्णयांवर आणि धोरणांवर वेळोवेळी टीका केली होती. अधिवेशनाच्या काळात सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी पायऱ्यांवर उभे राहून शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. ‘पन्नास खोके, एकदम ओके’पासून घोषणाबाजी केली, पण आता थेट सरकारमध्ये सामील झाले याची आठवण आज शासकीय अधिकारी काढत होते.

निदान फोटो तरी काढू नका

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘पहिले वर्ष सुराज्याचे’ या पुस्तिकचे प्रकाशन करतानाचे ‘फोटोसेशन’ करताना तरी निदान अजित पवार, छगन भुजबळ यांनी बाजूला व्हायला पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने दिली.

तेव्हा खडे बोल आणि आता सोबतीला

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाली तेव्हा झालेल्या पत्रकार परिषदेत तुम्हाला राज्यात सत्ता हवी, मंत्री व्हायचे आहे, सरकारी गाडी, बंगला, सुरक्षा पाहिजे, पण काम करायचे नाही हे कसं चालेल? सत्तासंर्षाचा निकाल येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत सत्तेत आहात तोपर्यंत तरी काम केले पाहिजे, असे खडे बोल अजित पवार यांनी सरकारला सुनावले होते. पण आज याच अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभागी होऊन सरकारच्या निर्णयाचे गोडवे गाणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन केले याकडे एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले.