Maratha Reservation Row – जरांगे पाटील यांना समर्थन, विशेष अधिवेशनाची मागणी; आमदारांचे मंत्रालयासमोर रास्ता रोको आंदोलन

फोटो- प्रातिनिधीक

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन केले. आमदारांनी मंत्रालयासमोरील मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले. आपले मनोज जरांगे पाटील यांना पूर्ण समर्थन असून सरकारला हा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात काय हरकत आहे असा सवाल या आमदारांनी विचारला.

या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सरकार बैठका बोलावते त्यापेक्षा सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार कैलास पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी आणि भाजपच्या राजू नवघरे यांनीही हीच मागणी केली. आपण विधानसभा अध्यक्षांना भेटून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करणार असल्याचे आमदार दुर्राणी यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पाटील यांनी म्हटले की, सत्ताधारी पक्षाचे आमदार त्यांचेच सरकार असताना आंदोलन करत असतील ते आश्चर्य आहे. मात्र ते लोकप्रितिनिधी आहे, त्यांच्यावर दबाव आहे. ते प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भात बुधवारी बोलवण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरली होती. या बैठकीत मराठय़ांना आरक्षण देण्यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. मराठा समाजाने सरकारला आणखी वेळ द्यावा आणि मनोज जरांगे-पाटील यांनी त्यांचे उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हात जोडून केली.

बुधवारी सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सर्व पक्षांचे एकमत असून हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असावे असा एकमुखी ठराव बैठकीत मंजूर झाला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इतर समाजांवर अन्याय न करता हे आरक्षण दिले जावे, अशी भूमिका सर्वपक्षीयांनी घेतली असल्याचे ते म्हणाले.

एकीकडे कुणबी नोंदी तपासून जात प्रमाणपत्रे दिली जात आहेत, तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली आहे. याआधी राहिलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी सरकारला वेळ हवा आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनिल परब आणि सुनील प्रभू, अजित पवार गटाचे सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, भाजपचे चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, भाजपचे चंद्रकांत पाटील, बसपाचे डॉ. प्रशांत इंगळे, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे, जनता दलाचे कपिल पाटील, मनसेचे राजू पाटील, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे, वंचित बहुजन आघाडीच्या रेखा ठाकूर, रिपब्लिकन पक्षाचे राजेंद्र गवई, गौतम सोनावणे, सचिन थोरात, आरएसपीचे बाळकृष्ण लेंगोर, वायएसपीचे रवि राणा, मिंधे गटाचे दादा भुसे आणि संजय शिरसाट उपस्थित होते.