इस्रायलविरोधात लाखो विद्यार्थी आक्रमक, अमेरिकेतील विद्यापीठे बनली वॉर झोन

इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या युद्धाला सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला असून गाझा पट्टीत अक्षरशः स्मशानासारखी अवस्था आहे. रोज शेकडोंच्या संख्येने नागरिक मरत असून भूकबळीही जात आहेत. इस्रायलकडून सुरू असलेले हल्ले ताबडतोब थांबवावेत, अशी मागणी करत अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये लाखोंच्या संख्येने विद्यार्थी आक्रमक झाल्याचे चित्र आहे. इस्रायलविरोधात सातत्याने निदर्शने होत असून त्याविरोधात अमेरिकन सरकारनेही कडक धोरण अवलंबले आहे. विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांना फरफटत नेले जात आहे. ही विद्यापीठे आता वॉर झोन बनली असून आतापर्यंत पोलिसांनी साडेपाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना अटक केली आहे.

विद्यार्थी आणि पोलिसांमध्येही चकमकी उडत असल्याचे व्हीडीयो व्हायरल झाले आहेत. अटलांटा एमोरी विद्यापीठात आज विद्यार्थ्यांनी इस्रायलच्या कारवाईविरोधात प्रचंड संताप व्यक्त करत निदर्शने केली. हे आंदोलन भडकू नये म्हणून पोलिसांनी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला.

रबरी गोळ्यांचा वर्षाव

विद्यापीठांमध्ये घुसून पोलिसांनी विद्यार्थ्यांवर रबळी गोळ्यांचा वर्षावर केला. त्यामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचे अटलांटा एमोरी विद्यापीठातील प्राध्यापकाने सांगितले. विद्यार्थ्यांची इस्रायलविरोधात घोषणाबाजी सुरूच होती. गाझामध्ये प्रचंड नरसंहार सुरू असून तो थांबवावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पोलीस अधिक आक्रमक झाले आणि अनेक विद्यार्थ्यांची धरपकड सुरू केल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पेपर बॉल, स्टेन गन आणि रबरी गोळ्यांचा वापर केला. त्यामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

– गाझामध्ये अत्यंत भयावह स्थिती असून तेथील पॅलेस्टिनींकडे पुरेसे अन्न नाही, पाणी नाही, उपचार करण्यासाठी वैद्यकीय साहित्य नाही. सगळीकडे स्मशानशांतता असून रोज भूकबळीने लोक मरताहेत. आतापर्यंत गाझा पट्टीत तब्बल 34,305 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला. त्यामुळे इस्रायलने हल्ले तत्काळ थांबवावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. अमेरिका आणि इस्रायलने तत्काळ सर्वकाही थांबवावे, अशी मागणी करणारी पोस्टर्स विद्यार्थ्यांच्या हातात होती.