‘अमृतनयना’तून आठवणींचा पट उलगडणार, नयना आपटे यांच्या कारकीर्दीचा गौरव

आपल्या आईकडून कलेचा सक्षम वारसा घेऊन अभिनेत्री नयना आपटे यांनी मालिका, चित्रपट, रंगभूमी, डबिंग अशी चौफेर मुशाफिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. या कला प्रवासाचे साक्षीदार होण्याची संधी रसिकांना ‘अमृतनयना’च्या रूपाने मिळणार आहे. नयना आपटे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या रंगभूमीय कारकीर्दीला 70 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून त्यांच्या कारकीर्दीच्या ‘अमृतनयना’ या विशेष सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सवाईगंधर्व’ आणि ‘संस्कृती सेवा न्यास’ यांच्या विद्यमाने मुलुंड येथील कालिदास नाटय़ मंदिरात 24 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता हा सोहळा होईल.

‘अमृतनयना’ या सोहळय़ातील कार्यक्रम तीन सत्रात रंगणार असून पहिल्या सत्रात नाटय़पदे, नाटय़प्रवेश आणि कथक नृत्य सादरीकरण होणार आहे. यात ज्येष्ठ गायक नट अरविंद पिळगावकर, पंडित मुकुंद मराङ्गे, ज्ञानेश पेंढारकर, नीलाक्षी पेंढारकर, अपर्णा अपराजित, गायत्री दीक्षित, आकाश भडसावळे, अथर्व गोखले, स्वराली गर्गे, प्रवीणकुमार भारदे, मकरंद कुंडले, आदित्य पानवळकर आदी कलाकारांचा सहभाग असणार आहे.

दुसऱया सत्रात नयना आपटे यांचा मान्यवरांकडून सत्कार होणार आहे. तसेच दिवंगत शांता आपटे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन आणि लवकरच प्रकाशित होणाऱया नयना आपटे यांच्या चरित्राचे मुखपृष्ठ अनावरण यावेळी होईल. तिसऱया सत्रात ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडीलकर या नयना आपटे यांची दिलखुलास मुलाखत घेणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून प्रवेशिका चार दिवसआधी नाटय़गृहात मिळतील.