सुवर्णा पाटील यांचा नावीन्यपूर्ण प्रयोग; गांडूळ खताद्वारे  शोधला प्रगतीचा मार्ग  

अलीकडच्या काळात शेतकरी शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करताना दिसत आहेत. शेतकरी शेतीबरोबर जोड व्यवसाय करत आहेत. यामध्ये महिला शेतकरीही मागे नाहीत. कोल्हापूर जिह्यातील  गोंडोली गावात राहणाऱ्या सुवर्णा भगवान पाटील यांनी असाच वेगळा प्रयोग करत गांडूळ खताद्वारे प्रगतीचा मार्ग शोधला आहे.

हवामान बदलामुळे आणि अनियमिततेमुळे  अल्पभूधारक शेतकऱ्यांना एका पिकाच्या उत्पन्नावर कुटुंब चालवणे तसेच शाश्वतपणे शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. 43 वर्षांच्या सुवर्णा कोका कोला फाऊंडेशनच्या पाठिंब्याने सॉलिडरिदाद आणि दालमिया भारत शुगर इंडस्ट्रीज यांनी  संयुक्तपणे राबवलेल्या उन्नती मीठा सोनाअंतर्गत त्यांच्या गावामध्ये आयोजित माती आरोग्य सुधारणा प्रशिक्षणामध्ये सामील झाल्या आणि त्यांना आशेचा किरण दिसला. तिथे सुवर्णा यांना गांडूळ खतासह पुनरुत्पादक कृषी पद्धती आणि त्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन मिळाले. उसाच्या शेतात  गांडूळ खत हे जैव खत पर्यावरणास अनुकूल व किफायतशीर पर्याय असल्याचे त्यांना समजले. त्याप्रमाणे सुवर्णा यांनी 2022 साली  स्वतःचे गांडूळ खत युनिट उभारायचे ठरवले.

 पाच महिन्यांत सुवर्णा यांना बदल दिसून आला. एका वर्मी बेड्सच्या माध्यमातून त्या 450 किलो गांडूळ खत बनवू शकल्या. त्यांनी ऊस पिकासाठी या गांडूळ खताचा वापर केला. दोन वर्मी बेड्सच्या माध्यमातून  3,200 किलोपेक्षा जास्त गांडूळ खत तयार करण्यामध्ये त्या यशस्वी ठरल्या आहेत. त्यांनी अतिरिक्त  गांडूळ खत गावातील इतर शेतकऱ्यांना विकले आणि 20 हजार रुपये कमावले. येत्या काळात गांडूळ खताचा व्यवसाय वाढवण्याचा सुवर्णा यांचा मनसुबा आहे.

विशेष उपक्रमांतर्गत सुवर्णा पाटील यांना वर्मीकंपोस्ट बेड (वर्मी बेड) मिळाले. ते कसे ठेवावे, याचे मार्गदर्शन तज्ञ प्रशिक्षक आणि फिल्ड कर्मचाऱ्यांकडून मिळाले.