चांद्रयान यश – काही देशांसाठी ‘द्राक्ष आंबट’!

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

ज्या भारतावर आपण दीडशे वर्षांपेक्षा अधिक काळ राज्य केले तो भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जात आहे, अमेरिका, रशिया, चीन या देशांनाही न जमलेली चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविण्याची कामगिरी भारताने करून दाखवली, हे खरे इंग्लंडच्या मीडियाचे दुखणे आहे. ब्रिटिश सरकार भारताला एक मजबूत मित्र, सहयोगी मानते आणि दोन्ही देश व्यापार करारावर बोलणी करत आहेत. त्यामुळे भारत-ब्रिटन संबंधांवर परिणाम व्हावा म्हणून असे प्रकार घडविण्यात येत आहेत अशी शंका व्यक्त केली जात आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चांद्रयान’ उतरवण्याचा ऐतिहासिक पराक्रम भारताने केला आणि बहुतेक राष्ट्रांनी त्याचे कौतुक केले. मात्र अवकाशातील महासत्तांमध्ये भारताचा झालेला समावेश इंग्लंडला पचनी पडलेला नाही. म्हणूनच त्यांची पोटदुखी सुरू झाली आहे.

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी भारताच्या चांद्रयानाचे कौतुक केले गेले आणि पाकिस्तान भारताच्या मागे कसा पडला आहे, पाकिस्तानमध्ये दहशतवाद कसा वाढला आहे, पाकिस्तानमध्ये अराजकता कशी वाढत आहे, आर्थिक प्रगती कशी होत नाही यावर अग्रलेख लिहिले.आजकाल पाकिस्तानमध्ये भारताच्या आर्थिक धोरणाची आणि आर्थिक प्रगतीची खूप स्तुती केली जाते.

चिनी माध्यमांनी चांद्रयानाकडे पहिले तीन दिवस पूर्ण दुर्लक्ष केले. चौथ्या दिवशी चीनचा अवकाश आणि आकाश प्रोग्राम भारताच्या किती पुढे आहे याची तुलना करून भारत चीनच्या किती मागे आहे हे दाखवण्यात आले.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चांद्रयान’ यशस्वीपणे उतरवत भारताने इतिहास रचला . यापूर्वीच अवकाशातील महत्त्वाच्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. त्यातच ‘चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा पहिलाच देश’ अशीही भारताची ओळख प्रस्थापित झाली ‘चांद्रयान-3’च्या या यशाचे बहुतेक पाश्चात्त्य देशांतील माध्यमांनी काwतुक केले. इतर वेळी भारताबद्दल हीन भावना ते व्यक्त करत असले तरी ‘चांद्रयान-3’च्या यशाने सारे मापदंड बदललेले दिसून येतात.

‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘द वॉशिंग्टन पोस्ट’, ‘द गार्डियन’, ‘सीएनएन’ यांच्यासह सर्वच प्रमुख माध्यमांचे ‘भारताने इतिहास घडवला’ यावर एकमत झालेले दिसते. मात्र अमेरिकेचे अब्जाधीश एलॉन मस्क यांनी उपरोधपूर्ण विधान केले की, ज्या बजेटमध्ये भारताने चांद्रयान पाठवले, त्या तुलनेत हॉलीवूड एखादा मोठा सिनेमा तयार करण्याकरिता दुपटीने पैसा खर्च करतो. अमेरिका, रशिया, चीननंतर अशी कामगिरी करणारा भारत हा चौथा देश आहे. भारताचे हे यश त्याच्या वाढत्या तांत्रिक क्षमतांचे तसेच अवकाशातील महत्त्वपूर्ण देश होण्याकडे वाटचाल होत असल्याचेच लक्षण आहे.

अर्थात त्याच वेळी इंग्लंडमधील काही माध्यमांनी ज्या देशात गरिबीची समस्या तीव्र आहे, त्या देशाने ‘चांद्रयाना’सारख्या मोहिमा आखून पैशांची उधळपट्टी करावी का, असा प्रश्न उपस्थित करत आपली वृत्तीच दाखवून दिली. भारतीयांसाठी पुरेशी स्वच्छतागृहेही उपलब्ध नाहीत, असेही या माध्यमांनी म्हटले. तसेच इंग्लंड भारताला जी आर्थिक मदत करतो, ती त्याने थांबवायला हवी. भारतासारख्या देशाकडे ‘चांद्रयाना’ची मोहीम आखायला पैसे असतील तर इंग्लंडने त्याला निधी पुरवत सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय करू नये, असा सल्लाही दिला. तसेच भारताने इंग्लंडने दिलेले पैसे परत करावेत, अशी मागणीही केली आहे. पॅट्रिक ख्रिस्टिस या पत्रकाराने 2016 ते 2021 या कालावधीत इंग्लंडने दिलेले 24 हजार कोटी रुपये परत करावेत, असे म्हटल्यामुळे नव्या वादंगाला तोंड फुटले. या वादाला नेहमीप्रमाणेच ‘बीबीसी’ने सुरुवात केली.

इंग्लंडने खरोखरच भारताला आर्थिक मदत केली का? या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार 2021 मध्ये इंग्लंडने अफगाणिस्तान, नायजेरिया, पाकिस्तान, इथिओपिया आणि येमेन या पाच देशांना अर्थसहाय्य केले. बांगलादेश आणि सीरिया हे दोन देशही त्यामागील वर्षांत या यादीत होते. भारताला कोणतेही थेट अर्थसहाय्य केले जात नाही . ‘बीबीसी’चा दावा दिशाभूल करणारा असाच आहे. भारताला दिला जाणारा निधी हा कर्ज तसेच गुंतवणूक स्वरूपात दिला जातो. हा वित्तपुरवठा ‘एफसीडीओ’मार्फत परतावा देणाऱया भारतीय उद्योगांमध्ये गुंतवणूक म्हणून केला जातो. इंग्लंड भारतातील स्वतःच्या आर्थिक हितसंबंधांना जपण्यासाठीच विकासासाठीचा निधी वापरत आहे. तसेच भारत-इंग्लंडदरम्यान भविष्यातील संबंधांसाठी व्यापक असा कार्यक्रम आखला गेला आहे. व्यापार, सुरक्षा, हवामान बदल, आरोग्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करणे हा यामागील हेतू असून नवीकरणीय ऊर्जा, आरोग्य यांसारख्या क्षेत्रांतील धोरणे, संस्था, क्षमता सुधारण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. म्हणजेच भारतात सुरक्षित गुंतवणूक करून इंग्लंड त्याचा पुरेपूर मोबदला वसूल करत आहे व हे व्यापार वाढवून इंग्लंडचा नफा वाढवण्याकरिता आहे. जगभरातील अर्थव्यवस्थांच्या वाढीचा वेग मंदावलेला असताना, युरोपसह अमेरिका मंदीच्या सावटाखाली असताना भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. त्याचा फायदा इंग्लंड घेत आहे.

‘बीबीसी’ने यापूर्वीही भारताबद्दल वादग्रस्त विधाने केलेली आहेत. इंग्लंडने (न) केलेली आर्थिक मदत भारताने परत करावी, अशी ही मागणी या निमित्ताने जर करण्यात आली असेल तर इतर बाबींचाही विचार व्हायला हवा. मग ती दोन्ही बाजूंनी पूर्ण व्हायला हवी. ‘ईस्ट इंडिया पंपनी’ने भारतातून नेमकी किती लूट केली, याचा अंदाज इतिहासकारांनाही लावता आलेला नाही. 1765 ते 1770 या कालावधीत ‘ईस्ट इंडिया पंपनी’ने केवळ बंगालमधून करस्वरूपात 23.8 दशलक्ष पाऊंड (आजचे 2.2 अब्ज पाऊंड) लुटले, असे विल्यम डॅरलिम्पल म्हणतात. अन्य एक इतिहासकार उत्सा पटनायक यांच्यानुसार 1765 ते 1938 या 173 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत इंग्लंडने भारतातून एकूण 45 ट्रिलियन डॉलर इतकी अफाट लूट केली. या लुटीची संपूर्ण आकडेवारी मिळणे अशक्यप्राय असल्याचे मानले जाते. कारण यात लाटलेल्या जमिनी, सांस्कृतिक चोरी, अफूचा व्यापार, संसाधनांची विक्री यांची मोजमाप करता येत नाही. म्हणजेच ‘ईस्ट इंडिया पंपनी’ने कितीतरी अधिक पटीने भारतातून इंग्लंडला संपत्ती, जडजवाहिर, सोनेनाणे नेलेले आहे. याचा हिशेब कोण करणार? कसा करणार? ‘बीबीसी’ने या प्रश्नाचे उत्तरही द्यावे, म्हणजे ते सोयीचे ठरेल.