मनतरंग- ऐकावे जनाचे…!

>>दिव्या नेरुरकर-सौदागर

तरुण वयात जेव्हा कुठल्याही कारणामुळे अपयश सामोरे येते तेव्हा त्या मुलांवर अपेक्षांचे दडपण जास्त असते. हे दडपण बहुतेकदा घरातील लोकांकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या लादले जाते. त्याच्या जोडीला होणारी तुलनाही मुलांना मारक ठरते. या सगळ्यात ‘विसंवाद’ आणि ‘स्व’ हे प्रमुख भूमिकेत असतातच. या स्थितीत नितांत गरज स्वतवर विश्वास ठेवण्याची.

”मॅम, मला लाईफमध्ये भरपूर सक्सेस मिळवायचा आहे. मी प्रयत्न खूप करतोय, पण माझा उत्साह लवकर संपून जातो. मला बरंच काही करायचं आहे.” विकास (नाव बदलले आहे) आपल्या ‘फ्युचर प्लॅन्स’बद्दल भरभरून सांगत होता. मात्र त्याच्या बोलण्यातून निराशा आणि निरुत्साह हे दोन्ही जाणवत होते. विकासची पार्श्वभूमी थोडक्यात अशी की, तो साधारण तिशीतला तरुण आणि होतकरू मुलगा. त्याच्याशी बोलताना लक्षात येत होतं की, अतिशय खडतर परिस्थितीतून हा मुलगा वर आलेला होता आणि त्याला त्याच्या आई-वडिलांच्या कष्टाचीही जाण होती. त्याला आता आई-वडिलांना सुखात ठेवायचं होतं आणि स्वतलाही. यासाठीच त्याची कितीही मेहनत घ्यायची तयारी होती.

“पण म्हणतात ना; आपण कितीही ठरवतो, असं करू, तसं करू, पण सगळंच नाही होत पॉसिबल” विकास त्याच्या समस्येकडे हळूहळू येत होता. “मी जे काही ठरवतो ते अचिव्ह नाही होत. मी आता एक छोटासा बिझनेस सुरू केला आहे. त्यासाठी मला नेटवर्किंग करावं लागतं. आधी मी करायचोही, पण जेवढं मी प्लॅनिंग केलं होतं तेवढे रिटर्न्स मला नाही मिळालेत. हे असं वर्षभर चालू आहे. त्यामुळे मला आता काम करायला खूप कंटाळा येतो. कुठलंही नवीन ठरवायला भीती वाटते आणि त्याचबरोबर माझी चिडचिडही वाढत चालली आहे. कधी कधी वाटतं, हे सगळंच सोडून द्यावं. मी काय करू?” असं म्हणून तो शांत बसला. त्याची ती अस्वस्थता आजच्या तरुणाईचं जणू प्रतिनिधित्वच करत होती.

विकास जसा त्याने ठरवल्याप्रमाणे गोष्टी न घडल्यामुळे नैराश्यात जात होता तसंच आज आपल्या आजूबाजूस किंवा काही घरांतही तरुण मुलं – मुली त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी न झाल्यास तणावात किंवा नैराश्यात गेल्याची उदाहरणं आपल्यापैकी अनेकांना हा लेख वाचताना आठवलीही असतील.

आजच्या तरुण पिढीला सगळं क्विक हवं, पेशन्स नाहीत किंवा त्यांना सारासार विचार नाही हे आणि असे काहीसे शेरेसुद्धा आपण लगेच मारून मोकळेही होतो. मात्र हे पूर्णपणे खरं आहे का याचा विचार केला तर कदाचित आपल्याला याच्या जोडीला काही कारणं अजून सापडतील.

अशा प्रकारच्या बहुतेक केसेस हाताळताना माझा असा अनुभव आहे की, तरुण वयात जेव्हा अपयश (कुठल्याही कारणामुळे का असेना) सामोरे येते तेव्हा त्या मुलांवर अपेक्षांचे दडपण जास्त असते. हे दडपण बहुतेकदा घरातील लोकांकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या लादले जाते. त्याच्या जोडीला दुसऱया घरातील त्याच वयाच्या मुला/मुलीबरोबर केलेली तुलनाही मग मुलांना मारक ठरते. या सगळ्यात ‘विसंवाद’ आणि ‘स्व’ हे प्रमुख भूमिकेत असतातच.

मुलं जसजशी तारुण्यात प्रवेश करतात तसतसे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत असते. यात दैनंदिन जीवनात येणारी आणि त्यांच्या स्वतपुढील आव्हाने कशा पद्धतीने हाताळायची याबाबत स्वतच ठरवतही असतात. या प्रवासात त्यांना मार्गदर्शनाची गरज तर असतेच.

त्याचबरोबर ती समजा कुठे चुकली तर सावरायचीही गरज असते, पण या गोष्टी जर मिळत नसतील तर ही मुलं तणाव किंवा नैराश्यात जाऊ शकतात. तसेच त्यांच्या नातेसंबंधांवरसुद्धा परिणाम होऊ शकतो. मग घराबाहेर वेळ काढणं, घरातील वडीलधारी मंडळी यांना चुकवणं, चुकीची संगत आणि सर्वकाही सोडून बसणं या गोष्टी घडू शकतात.

“माझा धाकटा भाऊ आहे. आमची परिस्थिती सुरुवातीला हलाखीची होती. त्यामुळे आम्ही दोघांनीही खूप मेहनत घ्यायचं ठरवलं. तो नोकरीला लागला आणि मी व्यवसायात. त्याचा पगार आणि प्रमोशन्स यामुळे त्याचे घरातले वजन वाढले आणि मला त्याचा खूप कॉम्प्लेक्स आला” विकास बोलता झाला होता. “आणि हो! माझ्या आई-बाबांचे टोमणे मला खावे लागतात. म्हणून मी सतत घराबाहेर असतो” हताशपणे त्यानं सगळं सांगून टाकलं. “मला आता खरोखर या सगळ्यातून बाहेर पडून सगळं व्यवस्थित करायचं आहे” असं त्यानं म्हणताच त्याला काही पर्याय सुचवले गेले.

त्यातील सर्वात महत्त्वाचा पर्याय होता तो म्हणजे ‘स्वतवर विश्वास ठेवणं’, ज्याची त्याला नितांत गरज होती. त्यासाठी विकासला स्वतवर काम करण्यास सांगण्यात आले. जसे की, स्वतच्या क्षमता-मर्यादा ओळखणे, स्वतचे गुण-दोष त्रयस्थपणे स्वीकारणे, स्वतची इतरांसोबत तुलना न करणे, स्वतला गुंतवून ठेवणे. हे पर्याय सुचवल्यावर त्याच्याबरोबर एक काही दिवसांची मर्यादा निश्चित करण्यात आली, ज्यायोगे त्याला सवय होईल आणि स्वयंशिस्त लागू शकेल. त्यासोबतच विकासच्या नकारात्मक विचारांवर आणि अतार्किक विचारांवर समुपदेशन सत्रे सुरू होतीच. दोन-अडीच महिन्यांनी याचा अपेक्षित परिणाम त्याच्यावर दिसू लागला.

आता विकासला हे समजलं आहे की, प्रत्येक व्यक्ती ही वेगळीच असते आणि तिने स्वतला ‘आहे तसं’ स्वीकारलं पाहिजे. त्याप्रमाणेच इतरांची आपल्याबद्दलची मते ही त्यांची स्वतची असतात. ती शाश्वत सत्ये (ळहग्नेत् ऊrल्tप्) नाहीत. त्यामुळेच आपला स्वतवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. तेव्हाच आपण आपले ईप्सित साध्य करू शकतो.

[email protected]  

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)