प्रॉमिसिंग : नृत्यांगना ते अभिनेत्री

>> गणेश आचवल

‘सुभेदार’ हा बहुचर्चित चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित होत आहे आणि त्यात सोयराबाईंची भूमिका करत आहे ‘नूपुर दैठणकर’ ही अभिनेत्री…एक प्रॉमिसिंग चेहरा.

नूपुरच्या घराण्यात कलेचा वारसा आहे. तिचे बाबा डॉक्टर धनंजय दैठणकर हे प्रसिद्ध संतूरवादक आहेत, तर आई डॉक्टर स्वाती दैठणकर या प्रसिद्ध भरतनाटय़म नृत्यांगना आहेत. नूपुरने फर्ग्युसन कॉलेजमधून फिलॉसॉफीमध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि त्यानंतर मुंबईतील नालंदामधून भरतनाटय़ममध्ये मास्टर्स पूर्ण केलं.

कॉलेजमध्ये असतानाच सह्याद्री वाहिनीवरील ‘दम दमा दम’ या नृत्यप्रधान कार्यक्रमाचे निवेदन आणि त्यात नृत्य सादरीकरणदेखील नूपुरने केलं होतं. नूपुरला नृत्यकलेसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्तीदेखील मिळाली होती. तिचे भरतनाटय़मचे कार्यक्रमदेखील सातत्याने सादर होत होते .

एकदा तिची मुलाखत वर्तमानपत्रात आल्यानंतर अनेकांनी तिचा जीवन प्रवास वाचून तिला फोन केले आणि त्यातलाच एक फोन होता राकेश सारंग यांचा. ‘जावई विकत घेणे आहे’ या झी मराठीवरील मालिकेत एक भूमिका नूपुरने करावी असे त्यांनी सांगितले. साधारण वर्षभर ती मालिका सुरू होती. दरम्यान, पुण्यात नूपुरची स्वतःची ‘नूपुरनाद अकॅडमी ऑफ म्युझिक अँड डान्स’ ही संस्था सुरू होती आणि या संस्थेतर्फे अनेक विद्यार्थिनींना नूपुर नृत्य प्रशिक्षण देत होती. कॅनडा, जपान, अमेरिका, न्यूयॉर्क असे परदेश दौरे करून नूपुरने तिथे भरतनाटय़म सादर केले होते.

या वेळी दिग्पाल लांजेकर याने नूपुरला ‘बाजी’ या संतोष कोल्हे दिग्दर्शित मालिकेतील ‘हिरा’ या भूमिकेसाठी विचारले. या मालिकेसाठी तिने तलवारबाजी, घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतले होते.

‘सुभेदार’बद्दल बोलताना नूपुर म्हणाली, जेव्हा दिग्पाल लांजेकर यांनी ‘सुभेदार’मध्ये सोयराबाईंची भूमिकेविषयी विचारले. मला खूप आनंद झाला. ‘शिवराज अष्टक’ या मालिकेतील एका चित्रपटाच्या निमित्ताने आपण त्या कुटुंबाचा एक भाग झाल्याचा आनंद हा अवर्णनीय होता. या चित्रपटासाठी ज्या पद्धतीने दिग्पाल लांजेकर यांच्याशी चर्चा झाली, प्रत्येक दृश्य चित्रित होताना जी मेहनत घेतली गेली, त्यातून खूप काही शिकता आलं.

नूपुरच्या या प्रवासात तिच्या नवऱयाची मिळणारी साथ पण महत्त्वाची आहे. ती म्हणते, मी आता पुन्हा परदेश दौऱयावर नृत्याच्या कार्यक्रमांकरिता जाणार आहे. माझे पती सौरभ हे आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. आम्हाला तीन वर्षांचा मुलगा आहे. संसार आणि करीअर यांचा मेळ घालत काम सुरू आहे.