नाटय़रंग – माणूस, नट, पात्र आणि वेषांतर

>> हिमांशू भूषण स्मार्त

नाटकातली पात्रे जशी नाटय़ानुभवाचे (ज्यात नाटकाचा आशयानुभव आणि रूपानुभव दोन्ही आले) माध्यम असतात, तशीच ती नाटय़ देऊ पाहते त्या भानाचे, आकलनाचे पदर, पापुद्रे उलगडण्याचेही माध्यम असतात. हे व्यामिश्रपण आधी लेखक शोधतो आणि संहिताबद्ध करतो. दिग्दर्शक-अभिनेते ते संहितेतून शोधतात. संहितागत शोधाला स्वानुभवातून लाभलेल्या शोधाची सामग्री बहाल करतात आणि पात्र प्रयोगात उभे राहते.

नाटक लिहिण्याच्या प्राक्रियेमधली एक अत्यंत जटिल गोष्ट असते पात्र योजना आणि त्याहून अधिक जटिल गोष्ट असते या योजनेमधल्या पात्रांच्या स्वभावाचे आंतरक्रियात्मक जाळे विणणे. नाटकामधली पात्रे केवळ अन्य पात्रांना आणि घटनांना प्रतिक्रिया देणारी झाली तर ती साधने बनून राहतात. कार्डबोर्डचे कटआऊट्स असावेत तसे ते सपाट आणि मितिहीन होतात. बरे, ती निव्वळ हुबेहूब जगण्याचे अनुकरण करणारी माणसेही होऊन चालत नाहीत. तशी माणसे तर प्रत्यक्षात जगण्यातही असतातच. मग ती नाटकाला जाऊन का बघायची? नाटकातली पात्रे जशी नाटय़ानुभवाचे (ज्यात नाटकाचा आशयानुभव आणि रूपानुभव दोन्ही आले) माध्यम असतात. तशीच ती नाटय़ देऊ पाहते त्या भानाचे, आकलनाचे पदर, पापुद्रे उलगडण्याचेही माध्यम असतात. नाटकातला प्रकाश जसा केवळ बघण्याची सोय म्हणून असत नाही, त्याला नाटय़ानुभव पांमित करणारा या नानाविध गुणवत्ता प्राप्त असतात. जसे की; पोत, तीव्रता, घनता, रंग, कोन, गती तसेच पात्र ज्या माणसाचे असते, त्याच्या स्वभावाव्यतिरिक्तही अनेक गुणवत्ता नाटय़पात्राला प्राप्त असतात. पात्राच्या देहाचा एक स्थिती-गतीत्म अनुभव असतो, पात्राचे काळ-अवकाश व्यापणे असते, पात्राच्या आवाजाचे श्राव्य असते, विकासगती असते. हे व्यामिश्रपण आधी लेखक शोधतो आणि संहिताबद्ध करतो. दिग्दर्शक-अभिनेते ते संहितेतून शोधतात. संहितागत शोधाला स्वानुभवातून लाभलेल्या शोधाची सामग्री बहाल करतात आणि पात्र प्रयोगात उभे राहते. नाटकातले पात्र चारदा जन्माला घातले जाते. एकदा लेखकाकडून, मग दिग्दर्शकाकडून, मग नटांकडून आणि सरतेशेवटी प्रेक्षकांकडून. याचा एक अर्थ असा की, नाटकातल्या पात्राकडे चारदा जन्मण्याएवढा ऐवज असावा लागतो. अन्यथा त्याचे चार जन्म होण्याऐवजी त्याच्या चार छायाप्रती निघू शकतात.

एका सीमित अर्थाने नाटकाच्या प्रयोगामध्ये पात्र हे नटाने केलेले वेषांतर असते. मनोबौद्धिक आणि मनोशारीरही. कधी कधी नटाचे वेषांतरित पात्र प्रयोगात पुन्हा वेषांतर करते. फार्सिकल नाटकांमध्ये असे अनेकदा घडते. ‘मोरूची मावशी’मध्ये असे घडते, ‘श्रीमंत दामोदरपंत’मध्ये असे घडते. फार्सिकल नाटकात वेषांतर घडते तेव्हा त्याचा प्रधान हेतू हास्यकारता निर्माण करणे हा असतो. पात्रांचा अस्तित्वशोध अथवा त्यांच्या स्वभावाचे-घडणीचे पापुद्रे सोलून काढणे इथे अपेक्षित नसते. काही नाटकांमध्ये मात्र वेषांतरे अस्तित्वशोधाची आणि अस्तित्वगोंधळाची सर्जनशील निदर्शक ठरतात. माणसे परस्परांच्या सहवासात आणि नात्यात असणे म्हणजे नेमके काय असते? याचा शोध घेणारी चं. प्र. देशपांडे यांची ‘वेषांतर’ नावाची नाटय़कृती आहे. चंप्रंची पात्र योजना हा त्यांच्या लेखनाचा प्रधान विशेष आहे. चंप्रंचे संवाद हाही मराठी नाटकाच्या संदर्भात अनन्य असणारा नाटय़विशेष आहे. ‘वेषांतर’मध्ये या दोन्ही विशेषांचा प्रत्यय येतो. विशेषत: पात्र योजनेचा. या एकांकिकेत मुख्यत: तीन पात्रे आहेत. अॅडव्होकेट सदानंद, त्याची पत्नी नीता आणि सदानंदचा क्लाएंट गुंदेचा. नीता आणि सदानंदचे नाते एका तिढय़ात अडकलेले आहे. म्हणजे ते तत्काळ भंगेल असे नाही, परंतु त्यांच्या नात्यात एक विसविशीतपणा आलेला आहेच आणि पर्यायाने असर्जकताही आलेली आहे. एकांकिकेच्या सुरुवातीलाच नीता मंचावर प्रवेश करत म्हणते, “कुठूनही सुरुवात केली की, असं वाटत राहतं की, याच्या आधी काही घडलंच नव्हतं.” असे ती आणखी दोनदा करते. या तीनही वेळी तिचे पवित्रे वेगळे आहेत. प्रथम घाई आहे, मग ढिलेपण आहे, मग दु:खातिरेक आहे. यातल्या कुठल्याच पवित्र्याने आर्ग्युमेंट्स लिहीत बसलेल्या सदानंदचे लक्ष वेधले जात नाही. याने नीता आणखीनच त्रस्त होते. नीता म्हणते, तिला एकटेपणाचा त्रास आहे. सदानंद तिला म्हणतो, “वकिली सोडतो आणि तुझा एकटेपणा घालवायचं बघत बसतो! आणि मग मी जगू कधी?”

सदानंद एक स्ट्रगलिंग वकील आहे. तो गुंदेचा नावाच्या क्लाएंटची आर्ग्युमेंट्स लिहीत बसलाय. कारण त्याने अॅडव्हान्स फी घेतलेली आहे. नीताच्या वागण्याने त्रस्त होऊन सदानंद त्याचा सहाय्यक म्हणून वेषांतर करतो. याचं नाव महेश्वर वर्टी. वर्टीचा वेष धारण केल्याने त्याला आर्ग्युमेंट्स लिहिण्यासाठी स्वस्थता लाभते. काही काळाने आर्ग्युमेंट्स वाचायला गुंदेचा येतो. हा कापडाचा व्यापारी आहे. गुंदेचा नीताच्या ब्लाऊजच्या कापडाचे कौतुक करतो. तो आणि नीता आतल्या खोलीत जाऊन गप्पा मारतात. त्यांच्या वागण्यातला मोकळेपणा वर्टी झालेल्या सदानंदला अस्वस्थ करतो.

’वेषांतर’मध्ये घडणाऱ्या वेषांतरांमुळे एक विलक्षण व्यामिश्रता निर्माण होते. मानवी स्वभावामधले अंतर्विरोध परस्परांवर आघात करत राहतात. यातून चकमकी घडतात. माणसे जगण्यासाठी ज्या व्यवस्था निर्माण करतात, त्या कशा अप्रस्तुत होत जातात हे ध्यानात येते. माणसांचे दु:ख, वेदना, त्रस्तता, विखंडन यांचे मूळ मानवाच्या स्वभावात शोधणारे चं. प्र. देशपांडे हे नाटककार आहेत. त्यांच्या सर्वच नाटकांमध्ये हा शोध आपल्याला पाहायला मिळतो. ‘वेषांतर’मध्ये तीन खऱ्या आणि तीन भासमान स्वभावांचे टकराव आणि सरमिसळ घडते. ‘वेषांतर’च्या नाटकीयतेमध्ये नाटय़ांतर्गत वेषांतरांचा लक्षणीय वाटा आहे. या वेषांतरांमुळे वर्तनाचे, भाषिक निवडीचे-लहेजाचे, वर्तनातील मूल्यविचाराचे, मानवी लगावांचे, आकर्षणांचे एकाच माणसातले दोन स्तर प्रेक्षकांच्या अनुभवास येत राहतात. एरवी चंप्रंच्या नाटकामधली पात्रे बहुस्तरीय असतातच, परंतु ‘वेषांतर’मध्ये एकाच माणसातले दोन खंड (एक मूळ आणि एक वेषांतरित) दिसत राहिल्याने ही बहुस्तरीयता आणखीनच गहिरी होते. जगताना आपण कोण-काय असायचे असते याच अनादी संभ्रमातील माणसे चितारताना वेषांतराची नाटकीयता अर्थगर्भता साधण्यास मर्मग्राही योगदान देते.

(लेखक नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)