संवाद मनाशी

>> किरण खोत,(प्रशिक्षक – व्यक्तिमत्त्व विकास आणि संभाषण चातुर्य)

शांत मन यशाची गुरुकिल्ली आहे. संत असो वा कोणतेही यशस्वी व्यक्तिमत्त्व, म्हणूनच सूर्योदयापूर्वी पहाटेला उठून आपल्या अंतर्मनाशी संवाद साधतात. आज आपल्या हातातला मोबाईल आपल्याला स्वस्थ बसू देत नाही आणि त्यामुळे आपण आपल्या मनाशी बोलतच नाही.

तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणायचे असतील तर तुम्हाला पहिले तुमचे विचार बदलायला हवेत. आयुष्यात प्रचंड साधेपणा आणायला हवा. आपल्याला आपली ओळख व्हायला हवी. ध्यान करणे, योग करणे, आजूबाजूच्या गोष्टींचे शांतपणे प्रतिक्रिया न देता निरीक्षण करणे आणि मनाला जमेल तितकी शांतता देणे यामुळे आपले हृदय आणि मन दोन्ही निरोगी व निकोप राहते.

स्वतः कधी दुखावले जाऊ नका आणि इतरांना न दुखावण्याची सवय अंगी बाळगा. भांडण, वाईट विचार या सगळ्या गोष्टींना मनाच्या कप्प्यातून कायमचे काढून टाका. मुळात क्षमा करा, सोडून द्या, त्यात तुम्हाला सगळ्यांची उत्तरे सापडतील.

मनात काही साठवून ठेवू नका. या गोष्टी आपण मनात साठवून ठेवत असतो, त्यांना आपण जिवंतपणे गाडलेलं असतं आणि याच जुन्या आठवणी पुन्हा कधीतरी विकृत स्वरूपात पुन्हा मनात येतात आणि आपल्या आयुष्यात संभ्रम निर्माण करतात. याउलट जे आहे, त्याबद्दल ईश्वराचे आभार माना. प्रत्येक लहान गोष्टीचा आनंद मनापासून घ्या. आपल्या आजूबाजूच्या वंचित आणि दुःखी लोकांना मदत करा आणि सुखदुःखाची तुलना तिथे करा.

शांत मन यशाची गुरुकिल्ली आहे. संत असो वा कोणतेही यशस्वी व्यक्तिमत्त्व, म्हणूनच सूर्योदयापूर्वी पहाटेला उठून आपल्या अंतर्मनाशी संवाद साधतात. आज आपल्या हातातला मोबाइल आपल्याला स्वस्थ बसू देत नाही आणि त्यामुळे आपण आपल्या मनाशी बोलतच नाही. शांत राहूनही एका प्रकारे आपण इतरांशी चर्चा करत असतो, त्यांच्या आयुष्यात काय चाललंय याचे स्टेटस बघत असतो आणि त्याची तुलना आपण उगाचच स्वतःशी करून आपण किती दुःखी आहोत किंवा सुखी आहोत याचा अंदाज बांधत असतो. अनुकरणाच्या मागे धावत असतो.

वर्षे महिन्यातून बनतात, महिने आठवडय़ातून, आठवडे दिवसातून आणि दिवस तासातून बनतात. म्हणूनच दिवसाच्या शेवटी तासातासाचा विचार करा की, तुम्ही नक्की काय करताय किंवा दिवसभरात काय केलं? तुम्हाला याचे उत्तर आपोआप सापडत जाईल.  तुम्हाला  काय मिळालं आणि यानंतर काय मिळणार आहे.

भीतीच्या जन्माचे ठिकाण हे मन आहे आणि त्यामुळे भीतीपासून मुक्त व्हायचं असेल तर मनाला शांत करणे खूप गरजेचे आहे. जितकं तुमचं मन संभ्रमावस्थेत असतं तितकी भीती वाढत जाते आणि तुम्ही तुमच्या अपेक्षित सकारात्मक उत्तरापासून तुम्ही दूर लोटले जाता. म्हणूनच वाचन करा, काहीतरी छान सापडेल. मलासुद्धा हे विचार तिथूनच सापडले. धावपळ थांबवा आणि मनाला शांत करा. चिंतन करा, तुम्हाला आपोआप अचानक पडलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडेल.