हार्ट अटॅकची लक्षणे

डॉ. विद्या सुरतकल

बैठय़ा जीवनशैलीमुळे आणि आहार-विहाराच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयविकाराच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. केवळ प्रौढांमध्येच नाही तर तरुणांमध्येही हे एक चिंतेचे कारण ठरत आहे. हल्ली तरुणांमधील हृदयविकाराचा झटका ही एक सामान्य बाब झाली आहे. धूम्रपानासारख्या वाईट सवयी, अपुरी झोप, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन आणि  बैठी जीवनशैली यांचा समावेश होतो. कामाचा तणाव आणि प्रदूषणाचे हानीकारक परिणाम हृदयाशी संबंधित समस्यांना कारणीभूत ठरतात.

हृदयविकाराची लक्षणे कशी ओळखतात? 

वेदनांचे दोन प्रकार आहेत – टिपिकल पेन (ठराविक वेदना) आणि एटिपिकल पेन ( विशिष्ट  वेदना). टिपिकल पेन हे अॅसिडिटीसारखे वाटल्याने गोंधळून टाकते. पोटाच्या वरच्या भागापासून ते छातीपर्यंत वेदना जाणवू शकतात. हृदयविकाराच्या झटक्याच्या बाबतीत ही वेदना वाढत जाते आणि मळमळ, उलटय़ा, गुदमरल्यासारखे वाटणे, जबडय़ासंबंधित वेदना, अस्वस्थता जाणवणे, छाती जड होणे तसेच छातीत किंवा पाठीत वेदना होणे यांच्याशी संबंधित आहे. या वेदना डाव्या हातापर्यंत पसरतात तसेच अस्वस्थ वाटणे, घाम येणे आणि थकवा जाणवतो. लक्षात ठेवा, हृदयाच्या नसा विस्तारलेल्या असून शरीराच्या कोणत्याही भागात वेदना होऊ शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला पायऱया चढताना कोपर दुखू शकतात. कधी कधी वेदना फक्त मनगटात किंवा दोन खांद्याच्या चकत्यांमध्ये होऊ शकतात. हृदयविकाराच्या समस्या या विलंब न करता त्वरित शोधण्यासाठी सतर्क आणि जागरूक असणे गरजेचे आहे.

हृदयविकाराची लक्षणे वेळीच ओळखा 

लक्षणे ओळखण्यात विलंब करणे आरोग्यास घातक ठरू शकते, तर काही वेळेस जीवघेणेदेखील ठरू शकते. वेळेवर उपचार केल्याने हृदयविकाराच्या झटक्यामुळे स्नायूंना होणारे नुकसान कमी होते आणि हृदयाचे पंपिंग कार्य सुरळीत करता येते.

निदान व उपचार : हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला ताबडतोब आपत्कालीन कक्षात दाखल करावे. अशा वेळी वेळ न दवडता जवळपास असलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज रुग्णालयात न्यावे. इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ण्उिं) केल्यानंतर एक आयव्ही घेतली जाते आणि ट्रोपोनिन आय चाचणीदेखील केली जाऊ शकते. ही चाचणी रुग्णाला हृदयविकाराचा झटका येत आहे की नाही, हे शोधण्यात मदत करते. रुग्णाच्या स्थितीनुसार बेडसाइड इकोकार्डिओग्राफी केली जाते. हृदयविकाराचा झटका तीव्र असल्यास रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल केले जाते. आपत्कालीन कक्षात क्रॅश  कार्ट, डिफिब्रिलेटर आणि व्हेंटिलेटर उपलब्ध असावेत. इन्फ्रक्टचे वेदना आणि आकार कमी करण्यासाठी त्वरित औषधोपचार सुरू केले पाहिजेत. रक्तवाहिन्यांमधील गुठळ्या दूर करण्यासाठी औषधांचा वापर केला जाऊ शकतो. कॅथ लॅबमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची तीव्रता गोल्डन अवरच्या आत कमी करण्यासाठी आपत्कालीन अँजिओप्लास्टी केली जाऊ शकते. हृदयविकाराच्या झटक्याची गुंतागुंत कमी करण्यासाठी वेळीच निदान आणि उपचार महत्त्वाचे आहेत. हृदयाच्या लक्षणांबद्दल जागरुक राहणे आणि निरोगी जीवनशैली राखणे गरजेचे आहे. नियमितपणे कार्डियाक पीनिंग करायला विसरू नका. 25 आणि त्याहून अधिक वयोगटातील व्यक्तींनी कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर आणि रक्तदाब पातळीचे निरीक्षण करण्यासाठी दर महिन्याला नियमित आरोग्य तपासणी व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वयाच्या 35 व्या वर्षापासून हृदयाच्या आरोग्याची नियमितपणे तपासणी करण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो. हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी वयाच्या 25 व्या वर्षापासून समुपदेशन घेणे फायदेशीर ठरू शकते.

(लेखिका मुंबईतील लीलावती हॉस्पिटल आण्ड रिसर्च सेंटरमध्ये कार्डिओलॉजिस्ट आहेत.)