लेख – प्लॅस्टिकचा वापर आणि पर्यावरण असमतोल

>> दिलीप देशपांडे,  [email protected]

 प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून प्लॅस्टिकचा वापर बंद करणे आवश्यक आहे. शासनाची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच आपलीही आहे. आपल्या बेजबाबदारपणामुळेच हे प्रदूषण वाढणार आहे. बऱ्याच ठिकाणी प्लॅस्टिक कचरा विघटनाची यंत्रणा उभारण्यात आलेली आहे, परंतु ती पुरेशी नाही. त्यात योग्य प्रमाणात वाढ होणे आवश्यक आहे. प्रसारमाध्यमातून, स्वयंसेवी संस्थांकडून, शिक्षण संस्थांकडून याचा प्रसार व्हायला हवा आहे. तसेच प्लॅस्टिकच्या वापरावर कडक बंदी आणायला हवी आहे.

आपल्याला स्वस्थ आणि निरोगी, प्रदूषणमुक्त आयुष्य जगायचे असेल तर आजूबाजूचे पर्यावरण नेहमी स्वच्छ असणे आणि स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. 2018 सालानंतर पाच वर्षांनी परत प्लॅस्टिकमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्यावर उपाययोजना हा विषय घेऊन जागतिक पर्यावरणाची संकल्पना परत आली आहे.

दरवर्षी पर्यावरण दिवस साजरा करताना एक घोषवाक्य असते. जसे 5 जून 2011 सालात हिंदुस्थानची प्रथमच यजमानपदी निवड झाली होती, ‘वन निसर्ग आपल्या सेवेसी’ असे घोषवाक्य होते. परत दुसऱ्यांदा 5 जून 2018 मध्ये हिंदुस्थानची यजमानपदी निवड झाली तेव्हा ‘प्लॅस्टिक प्रदूषणाशी संघर्ष’ असे घोषवाक्य होते. या वर्षी जागतिक पर्यावरण दिवस कोलंबियात साजरा झाला. गतवर्षी ‘जैवविविधता’ हे घोषवाक्य होते. जैवविविधता म्हणजेच जिवांची विविधता. मग त्यात पशू, पक्षी, निरनिराळे प्राणी येतात. पर्यावरण समतोल राखण्यासाठी जैवविविधता संपन्न असायला हवी. आपण बघतो निरनिराळय़ा कारणांमुळे ती कमी होत आहे. त्यावर उपाययोजना करायला हव्यात.

पर्यावरणाचा समतोल न राहण्याचे प्रदूषण हेच महत्त्वाचे कारण कसे आहे ते बघू आणि आपला सर्वसामान्य माणसाचा त्याच्याशी काय संबंध आहे, आपण काय करू शकतो, काय करत नाही हे पाहणेही उचित ठरेल. तसेच शासकीय/प्रशासकीय पातळीवर काय करता येईल, काय होत नाही हे बघू.

प्रदूषण कोणकोणत्या मार्गाने कसकसे होते आणि कोणामुळे होते ते पाहू. वायुप्रदूषण/हवेतून होणारे. ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण, जुनी इलेक्ट्रिक उपकरणे, प्लॅस्टिक कचरा यामुळे निर्माण होणारे प्रदूषण, वातावरणातील बदलाने निर्माण होणारे प्रदूषण, अर्थातच निसर्गनिर्मित प्रदूषण. अनेक कारखाने आहेत, त्यांच्या निर्मिती प्रक्रियेतून वायू, धूर निर्मिती होत असते. बऱ्याच वेळी हा विषारी वायू आरोग्यासाठी हानीकारक तर असतोच, पण त्यामुळे सभोवतालचे वातावरण दूषित होते. वाहनांची संख्या खूप वाढली आहे. जुनी वाहने, वेळीच सर्व्हिसिंग न होणारी वाहने खूपच धूर सोडतात. त्यामुळेही मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होते. आपल्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, वाहन तपासणी होते, पोल्युशन प्रमाणपत्र बंधनकारक आहे, पण कुठेतरी या दोन्ही प्रक्रियेत काहीतरी दोष आहेत. त्यात सुधारणा हवी आहे. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे निर्माण झालेला असह्य ध्वनी म्हणजे ध्वनिप्रदूषण. कारखान्यातील यंत्रांचे आवाज, वाहनांचे कर्कश हॉर्न, सायलेन्सरविना चालणाऱ्या गाडय़ा, मर्यादेपलीकडे डेसिबलने वाजणारे डीजे हे कारणीभूत ठरतात व त्यामुळे अस्वस्थता, चिडचिड निर्माण होते. कारखान्यातील निर्मिती प्रक्रियेतून निर्माण होणारे रसायनेमिश्रित दूषित पाणी नद्या, नाले, तलावात सोडले जाते. ते आजूबाजूच्या परिसराला त्रासदायक ठरते. आजूबाजूला पाण्याचे स्रोत असतील, ते दूषित होतात. ते पाणी पिऊन मोठय़ा प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडतात. बऱ्याच मोठय़ा शहरांत सांडपाण्याची विल्हेवाट व्यवस्थित नसते. ते एक कारण आहेच. प्लॅस्टिकचा कचरा, जुनी इलेक्ट्रिक उपकरणे फेकून दिली जातात. ती नष्ट होत नसतात.

प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी येऊनही सर्रास वापर सुरू आहे. आपल्याला तर ते घातक आहेच, तसेच जनावरेही ते खाऊन मृत्युमुखी पडतात, पशुधन नष्ट होते. रस्त्याच्या दुतर्फा पडलेले कचऱ्याचे ढीग आपण पाहतोच. निसर्गातील अर्थातच वातावरणातील बदलाचा पर्यावरणाचा समतोल ढासळण्यावर मोठा परिणाम होतो. आताचेच उदाहरण बघा. निसर्ग वादळ पावसाने हजारो वृक्ष कोलमडून, उन्मळून गेले. आपण शहराच्या सुशोभनासाठी, वाहतूक मार्गासाठीही अशीच हजारो वृक्षांची कत्तल करतो. एकीकडे वृक्षारोपण कार्यक्रम राबवतो. खूप वर्षांची वाढलेली वृक्षे नष्ट झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढळतो. ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. प्रत्येकाने एक वृक्ष लावण्याचा, जगवण्याचा संकल्प करायला हवा. सरकारी वृक्षारोपण कार्यक्रमात पारदर्शकता हवी. नाहीतर त्याच त्या जागी दरवर्षी वृक्षारोपण केल्याच्या बातम्या आपण वाचतो.

पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची काही मानवनिर्मित, तर काही निसर्गनिर्मित कारणे आहेत. मानवनिर्मित कारणांनी प्रदूषण वाढून पर्यावरणाचा समतोल ढळत आहे, ती आपली सगळय़ांची जबाबदारी आहे. त्याला आपणच पायबंद घालायला हवा. प्रत्येकाने मनावर घेतले तर सहज शक्य आहे, पण तेच होत नाही. अनेक अभियाने राबवली जात आहेत. जसे प्लॅस्टिक पिशवी मुक्ती अभियान, स्वच्छता अभियान अधिक कडकपणे राबवायला हवे. अजून बाजारपेठेत पिशव्या सापडतात, रस्त्यावर थुंकणाऱ्यांचे प्रमाण कमी होत नाही.

प्रदूषण नियंत्रण महामंडळ, गावोगावच्या ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांनी तसेच अभियानांची जबाबदारी ज्यांच्यावर दिली आहे, त्यांनी आपले कर्तव्य, जबाबदारी आत्मीयतेने पार पाडली तर हे सहज शक्य आहे. वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई करायलाच हवी. ती कोणी करावी हे नक्की करायला हवे. त्यात ‘तू तू मै मै’ नको.

या वर्षी जागतिक पर्यावरण दिनाची थीम म्हणजे संकल्पना प्लॅस्टिक प्रदूषणावरील उपाय (Beat Plastic Pollution) अशी यजमान देश आहे नेदरलँड. प्लॅस्टिकच्या प्रदूषणापासून आरोग्यावर, अर्थव्यवस्थेवर आणि पर्यावरणावर जे घातक परिणाम होतात, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी तातडीची कारवाई करणे आवश्यक आहे. प्रदूषण वाढत आहे याला महत्त्वाचे कारण म्हणजे प्लॅस्टिकचा दैनंदिन जीवनात बेसुमार वापर. प्रत्येक ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर केला जातो. त्याचे दुष्परिणाम माहिती असूनही, त्यावर बंदी आणूनही छुप्या मार्गाने प्लॅस्टिक वापर मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. आताच प्लॅस्टिकच्या संशोधकांनी मानवी रक्तातदेखील प्लॅस्टिकचे कण सापडल्याचे म्हटले आहे. त्यावर अजून संशोधन सुरू आहे. ऍमस्टरडॅम येथील युनिव्हर्सिटी आणि ऍमस्टरडॅम मेडिकल सेंटरच्या संशोधकांनी 22 लोकांच्या रक्ताची तपासणी केली. त्यात 22 पैकी 17 लोकांच्या रक्तात प्लॅस्टिकचे कण होते. म्हणजेच 80 टक्के लोकांच्या रक्तात मायक्रो प्लॅस्टिक आढळले. ‘एन्व्हायर्नमेंट इंटरनॅशनल जनरल’मध्ये याविषयी माहिती देण्यात आली आहे.

दैनंदिन जीवनात आपण भाजीपाला, किराणा वस्तू, दूध, कपडा, कुल्फी, आईस्क्रीम गाडीवर, पुस्तकाच्या दुकानात, प्रवासात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर अगदी सहजपणे करत असतो. मग त्या पिशव्यांची जाडी किती मायक्रॉनची आहे हे पाहायला कोणालाही वेळ नसतो. कारण जीवन गतिमान झाले आहे. तसेच फ्रिजमधल्या बाटल्या, प्रवासात आपण घेतो ती पाण्याची बॉटल हे सर्व वापरतो आणि त्यानंतर ते अगदी सहजपणे कचऱ्यात टाकतो. या कचऱ्यापासून विषारी वायू निर्माण होतोच, पण अन्नाबरोबरच त्या पिशव्याही जनावरे खातात आणि दरवर्षी हजारोंनी पशुधन नष्ट होते.