यंगिस्तान – डोंगर भटक्यांना प्रिय… किल्ले कर्नाळा

>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक 

गोनीदांपासून अनेक डोंगर भटक्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा सुळका म्हणजे किल्ले कर्नाळा होय.

सह्याद्रीत कुर्रेबाज सुळक्यांची कमतरता नाही. पनवेलजवळचा अंगठय़ाप्रमाणे आकाशात झेपावलेला एक सुळका विशेष आहे. गोनीदांसारख्या दुर्गवेडय़ा लेखकालाही हा सुळका विशेष भावला आणि त्यातून ‘जैत रे जैत’सारखी अजरामर कलाकृती साकार झाली.

कर्नाळा किल्ल्यास भेट देण्यासाठी आपणास पनवेल-शिरढोण ते कर्नाळा पक्षी अभयारण्य असा प्रवास करावा लागतो. गडावर जाणारी वाट याच अभयारण्यातून जाते. साधारण तासाभरात आपण एका सपाटीवर येऊन पोहचतो. येथून उजवीकडे जाणाऱ्या वाटेने खडी चढण पार करून आपण गडाची अधिष्ठाता असलेल्या कर्णाई देवीच्या घुमटीजवळ येतो. कर्णाई देवीचे दर्शन घेऊन  आपण गडाच्या पहिल्या भग्न प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो. पुढे रेलिंगच्या सहाय्याने कातळ टप्पे चढून आपण तटबंदीतील सुस्थितीत असलेल्या दुसऱ्या दरवाजात येतो. या प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला एक शरभशिल्प, तर कमानीवर आतल्या बाजूला कमळ शिल्पे कोरलेली आहेत. या प्रवेशद्वारातून आत आपण गडप्रवेश करतो.

गडप्रवेश करताच समोरच छतविरहीत राजवाडय़ाची भव्य वास्तू आपले लक्ष वेधून घेते. या वास्तूच्या समोर आजमितीस फक्त दरवाजाची कमान शिल्लक राहिलेली वास्तू आहे. आपण या दोन्ही वास्तू पाहून सुळक्याच्या बरोबर खाली असलेल्या किल्ल्याच्या चौथ्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो. दुरून अंगठय़ाप्रमाणे दिसणाऱ्या या सुळक्याची भव्यदिव्यता जवळ गेल्यावरच कळते.

पुढे सुळका उजव्या हाताला ठेवून आपण किल्ल्याच्या मागील अंगाकडे मार्गस्थ व्हायचे. डाव्या हाताला दूरवर गेलेल्या माचीकडे उतरण्यासाठी एक छोटेखानी प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून खाली उतरलो की, एक वाट किल्ल्याच्या पिछाडीस जाते. एक भग्न प्रवेशद्वार ओलांडून आपण गडाचा कातळ उजवीकडे ठेवत अरुंद वाटेने किल्ल्याच्या पिछाडीवर असणाऱ्या बुरुजाकडे मार्गस्थ व्हायचे. पुढे वाटेत पाण्याचे एक कातळकोरीव टापं आहे. शेवटी एका भग्न प्रवेशद्वारातून आपण बुरुजावर प्रवेश करतो. येथून बराच दूरवरचा मुलूख न्याहाळता येतो.  हा बुरूज पाहून आपण आल्या वाटेने परत माचीकडे उतरणाऱ्या प्रवेशद्वारापाशी यायचे.

माचीच्या शेवटी असलेल्या बुरुजावर उतरण्यासाठी एक खणखणीत प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस शरभशिल्पे व काही फुले कोरलेली आहेत. या बुरुजावरून  दूरवर पसरलेल्या जंगलाचे, माणिकगड, प्रबळगड, सांकशीसारख्या किल्ल्यांचे सुंदर दर्शन होते. अशा रीतीने  गडफेरी पूर्ण होते. कर्नाळा किल्ल्याचा परिसर म्हणजे पक्ष्यांचे नंदनवन. निसर्गाचे सान्निध्य लाभल्याने सर्व ऋतूंत दुर्गप्रेमींना भावणारा हा गड आहे.

कर्नाळा किल्ल्याची निर्मिती त्याच्या सुळक्याच्या पोटात असलेल्या कातळकोरीव टाक्यांवरून सातवाहन काळातील असावी. या किल्ल्याचा वापर मुख्यत्वे टेहळणीसाठी होत असावा. सन 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण-भिवंडी जिंकून घेतली, त्या वेळी कर्नाळा किल्ला त्यांच्या ताब्यात आला. 1666 मधील पुरंदर तहानुसार महाराजांनी कर्नाळा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला. 22 जून 1670 रोजी मराठय़ांनी कर्नाळा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. शेवटी जानेवारी 1818 मध्ये इंग्रज अधिकारी कर्नल प्रॉथरने कर्नाळा किल्ला घेतला.