
दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याच्या सुनावणीपासून न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी दूर व्हावे, अशी मागणी या प्रकरणातील आरोपी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज उच्च न्यायालयात न्या. शर्मा यांच्याच खंडपीठापुढे केली. ’न्यायमूर्ती शर्मा या चार वेळा आरएसएसशी संबंधित संघटनेच्या कार्यक्रमाला हजर होत्या. त्या विशिष्ट विचारधारेशी संबंधित आहेत. त्यांच्याकडून मला न्यायाची अपेक्षा नाही,’ असा युक्तिवाद केजरीवाल यांनी केला.
मद्य घोटाळ्यात आरोपी असलेले अरविंद केजरीवाल यांच्यासह 23 जणांना सत्र न्यायालयाने 27 फेब्रुवारी निर्दोष मुक्त केले. सीबीआयने या निर्णयाला उच्च न्यायालात आव्हान दिले. या खटल्याची सुनावणी न्या. शर्मा यांच्या एकल पीठापुढे सुरू आहे. शर्मा यांच्या खंडपीठापुढे सुनावणीला केजरीवाल यांनी आक्षेप घेतला आहे. त्यासाठी त्यांनी काही कारणे दिली आहेत.
– न्यायमूर्ती शर्मा या आरएसएसशी संबंधित अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या अनेक कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. ही संघटना विशिष्ट विचारधारेची असून आमचा पक्ष त्यांच्या विचारांना विरोध करतो. आम्ही ज्या विचारांचा विरोध करतो त्याच विचारांच्या न्यायाधीश असतील तर मला न्याय कसा मिळणार?
– या न्यायालयाने आतापर्यंत पाच प्रकरणांत सीबीआय आणि ईडीने केलेले युक्तिवाद ग्राह्य धरले आहेत. सीबीआय मला लवकरात लवकर दोषी ठरवण्याच्या प्रयत्नात आहे. हे न्यायालय त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकते.
– आरोपपत्र दाखल होण्याआधीच या न्यायालयाने अशा अनेक टिप्पण्या केल्या आहेत, ज्या थेट एखाद्याला दोषी ठरवणाया वाटतात.
– माझ्या प्रकरणात अटक योग्य होती की नाही एवढेच या न्यायालयाला ठरवायचे होते. मात्र, अवघ्या दोन सुनावण्यांमध्येच न्यायालयाने आपला निर्णय ठरवून टाकला होता.
– या न्यायालयाने मला नीट बाजू मांडण्याची संधीही दिली नाही. अवघ्या पाच मिनिटांच्या सुनावणीत माफीच्या साक्षीदाराने दिलेल्या जबाबावर विश्वास ठेवण्यात आला.
– मद्य प्रकरणात याच न्यायालयाने मला भ्रष्ट म्हटले होते, मात्र सुप्रीम कोर्टाने तो आदेश रद्द केला. या न्यायालयाचे तीन आदेश सुप्रीम कोर्टाने फिरवले आहेत. त्यावरूनच हे न्यायालय एकतर्फी काम करते हे सिद्ध होते.
– ट्रायल कोर्टाने या प्रकरणात सीबीआयवर ताशेरे ओढले होते. मात्र, सीबीआयच्या मागणीनुसार या न्यायालायने ते ताशेरेही खोडून काढले.
– न्यायमूर्तींच्या जवळचे लोक वादी-प्रतिवादींशी किंवा वकिलांशी संबंधित असतील तर न्यायमूर्ती अशा सुनावणीपासून दूर राहतात. त्याचप्रमाणे तुम्हीही या प्रकरणापासून दूर व्हावे.
























































