अमित शहांनी माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही – अरविंद केजरीवाल

सीएए कायदा लागू झाल्यानंतर त्यावरून चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या पत्रकार परिषदेवर उत्तर देताना गृहमंत्र्यांनी माझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. फक्त मी कसा आहे एवढंच सांगत राहिले, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.

सीएए कायद्याच्या अंमलबजावणीविषयी केजरीवाल यांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. मी या देशातील 140 कोटी जनतेविषयी बोलतो आहे. जर आपण आपल्याच नागरिकांना, तरुणांना नोकरी देण्यासाठी असमर्थ आहोत, तर इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही पाकिस्तान, बांगलादेशच्या नागरिकांना इथे येण्यासाठी का प्रोत्साहन देताय? त्यांना तुम्ही रोजगार कसा देणार? आधी आपल्या इथल्या तरुणांसाठी तरी किमान नोकऱ्यांची तरतूद करा. हाच माझा मूळ प्रश्न आहे. या सगळ्या निर्वासितांसाठी घरं कुठून आणणार? त्यांना नोकरी आणि इतर संसाधनांची पूर्तता कशी करणार? अशी सरबत्ती केजरीवाल यांनी केली.

स्वातंत्र्यावेळी जसे निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे इथे आले, त्यापेक्षाही मोठं स्थलांतर यावेळी होणार आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातील अल्पसंख्याकांची संख्या जवळपास अडीच ते तीन कोटी इतकी आहे. तिथे प्रचंड गरिबी, बेरोजगारी आहे. हिंदुस्थानाचं नागरिकत्व हे त्यांच्यासाठी खूप मोठ्या स्वप्नाप्रमाणे आहे. देशाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले तर इतके नागरिक इथे येतील, ज्याची कल्पनाही आपण करू शकणार नाही. जर इतके लोक इथे आले तर त्यांचं पुनर्वसन आपण कुठे आणि कसं करणार आहोत, या माझ्या प्रश्नाचं उत्तर अमित शहा यांनी दिलंच नाही, असं केजरीवाल यावेळी म्हणाले.