जेवणातून विषारी मशरूम खायला घालून पूर्वाश्रमीच्या सासू – सासऱ्यांची केली हत्या

ऑस्ट्रेलियात एका महिलेने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या तीन कुटुंबियांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एरिन पॅटरसन या महिलेला अटक केली असून तिने जेवणातून विषारी मशरूम खायला घालून त्यांची हत्या केली.

एरिन पॅटरसन हिचा गेल्या वर्षी तिचा पती सायमन पॅटरसन याच्यासोबत घटस्फोट झाला होता. तरीही दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. एरिनने सायमनच्या कुटुंबियांना जेवणाचे आमंत्रण दिले होते. मात्र काही कारणास्तव स्वत:सायमन या जेवणाच्या कार्यक्रमाला हजर राहू शकला नाही. सायमनचे आई वडील गेल आणि डॉन पॅटरसन, गेलची बहीण हेदर विल्किन्सन व तिचा पती इयान हे जेवणासाठी एरिनच्या घरी आले होते. जेवणात एरिनने मशरुम बनवले होते. पण तिने त्यासाठी डेथ कॅप मशरुम वापरले होते. हे अर्धे मशरुम जरी खाल्ले तरी माणसाच्या शरीरात विषबाधा होऊन त्याचा मृत्यू होतो. या जेवणानंतर सायमनच्या कुटुंबातील तिघांचा विषबाधेने मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी एरिन पॅटरसनला अटक केली आहे. एरीनच्या घरातून पोलीस अधिकार्‍यांनी अनेक वस्तू जप्त केल्या आहेत त्यात मशरूम तयार करणारा फूड डिहायड्रेटर सापडला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.