फंडिंगचा आरोप सिद्ध करा, अन्यथा माफी मागा! बारसू-सोलगाव रिफायनरीविरोधी संघटनेचे देवेंद्र फडणवीसांना खुले आव्हान

बारसूसोलगाव रिफायनरीविरोधी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांना बंगळुरूमधून फंडिंग मिळते हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावा, अन्यथा आंदोलनकर्ते आणि ग्रामस्थांची माफी मागावी, अशी जोरदार मागणी बारसूसोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेने केली आहे.  

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एका प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरीविरोधी संघटनेसह राज्यातील विविध प्रकल्पांविरोधात उभ्या असलेल्या आंदोलनकर्त्यांना बंगळुरूमधून फंडिंग होते. हे आंदोलनकर्ते तिकडे जाऊन पैसे घेऊन येतात आणि महाराष्ट्रात आंदोलन करतात. हे आंदोलनकर्ते सर्वत्र सारखेच असतात. हीच ठरावीक माणसे एनजीओच्या जोरावर सतत विरोध करत असतात, असा घणाघाती आरोप केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली. हा आंदोलनाला बदनाम करण्याचा सरकारचा डाव असल्याने यावर बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेने शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांचे सर्व आरोप खोडून काढले.

आम्ही आमचे सर्व आर्थिक व्यवहार कागदपत्रे दाखवायला तयार आहोत. आमची सर्व बँकांची पासबुके दाखवतो. फडणवीस यांनी ती नीट तपासावीत, मात्र त्यात फंडिंगचा पैसा सापडला नाही तर सरळ माफी मागावी. एवढा मोठा आरोप करायची तुमची तयारी असेल तर माफी मागायलासुद्धा कचरता कामा नये, अशी ठोस भूमिका रिफायनरीविरोधी संघटनेने घेतली. यावेळी बारसू-सोलगाव रिफायनरीविरोधी संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अमोल बोळे, नितीन जठार, नरेंद्र जोशी, वैभव कोळवणकर, सतीश बाणे, दीपक जोशी, कमलाकर गुरव आणि सत्यजीत चव्हाण यांनी यावेळी आपली बँक पासबुके आणि आर्थिक व्यवहार सरकारसमोर ठेवण्याची तयारी दाखवली. रिफायनरीविरोधी संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलेच कोंडीत सापडण्याची चिन्हे आहेत.

आंदोलकांना बदनाम करणे हाच सरकारचा अजेंडा

आंदोलनांना बदनाम करणे हा सध्याच्या सरकारचा अजेंडा आहे. मात्र तो करताना ते आपल्या हक्कांसाठी लढणाऱया बारसूसोलगावसह राज्यातील ग्रामस्थांचा घोर अपमान करत आहेत. माती परीक्षणाला विरोध करणाऱ्या बारसूमधील ग्रामस्थांवर लाठीचार्ज करणारे, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणारे, 450 ग्रामस्थांवर केसेस टाकणारे हे सरकार किती खोटे बोलत आहे हे आता सगळ्यांना कळून चुकले आहे, असेही संघटनेने म्हटले आहे.

निर्धार पक्काच… कुठल्याही परिस्थितीत रिफायनरी होऊच देणार नाही

ग्रामस्थांना विश्वासात घेण्याची भाषा तर नुसत्या लोणकढी थापा आहेत आणि आताचे आरोपसुद्धा दिशाभूल करणारे आहेत. मात्र बारसू-सोलगावमधील ग्रामस्थ ठाम असून कुठल्याही परिस्थितीत रिफायनरी होऊ  देणार नाही, हा निर्धार पक्का आहे, असा निर्धार संघटनेच्या वतीने करण्यात आला.

आमची सर्व बँकांची पासबुके दाखवतो. फडणवीस यांनी ती नीट तपासावी, मात्र त्यात फंडिंगचा पैसा सापडला नाही तर सरळ माफी मागावी