एकदा चार्ज केल्यानंतर 50 वर्षे मोबाईल चालणार, चिनी कंपनीने तयार केली तगडी बॅटरी

बॅटरी डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा करावे लागणारे चार्जिंग, गरजेच्या वेळी बॅटरी संपणे, चार्जिंगची सुविधा नसणे यामुळे जगभरातील अनेकांना त्रास सहन करावा लागतो. या त्रासातून लवककरच कायमची सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चीनमधल्या एका स्टार्टअप कंपनीने एकदा चार्ज केल्यानंतर पुढची 50 वर्ष चालेल अशी बॅटरी तयार केली आहे. द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, चायनीज स्टार्ट-अप Betavolt ने एक बॅटरी तयार केली आहे जी 50 वर्षे चार्जिंगशिवाय आणि मेन्टेनन्सशिवाय टिकू शकते. ही एक आण्विक बॅटरी असून ती दिसायला नाण्यापेक्षा लहान आहे. अणुऊर्जेवर काम करणारी ही जगातील सर्वात लहान बॅटरी आहे असून ही बॅटरी अजून चाचणी स्तरावर आहे. या बॅटरीचा वापर फोन आणि ड्रोनमध्ये करता येऊ शकेल आणि यासाठी त्याचे व्यावसायिक उत्पादन करण्याचा विचार सध्या सुरू आहे.

बीटावोल्ट कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘बीटाव्होल्ट बॅटरी हवाई तंत्रज्ञान, एआय उपकरणे, वैद्यकीय उपकरणे, मायक्रोप्रोसेसर, लहान आकाराचे ड्रोन, मायक्रो-रोबोट आणि प्रगत सेन्सर्सच्या दीर्घकालीन उपयोगासाठी उत्तम पर्या. आहे. या बॅटरीचा आकार 15x15x5 मिलीमीटर आहे. आयसोटोप्स आणि डायमंड सेमीकंडक्टरच्या मदतीने बनविण्यात आलेली ही बॅटरी वेफरइतकी पातळ आहे. ही आण्विक बॅटरी 3 व्होल्टमध्ये 100 मायक्रोवॅट पॉवर निर्माण करते. बॅटरीमधून निघणाऱ्या रेडिएशनपासून मानवी शरीराला कोणताही धोका नाही आणि त्यामुळेच ही बॅटरी पेसमेकरसारख्या वैद्यकीय उपकरणांमध्येही वापरली जाऊ शकते असे कंपनीचे म्हणणे आहे.

पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित

ही बॅटरी आयसोटोप्समधून निघालेल्या ऊर्जेचे विजेमध्ये रूपांतर करते. हे तंत्रज्ञान 20 व्या शतकात विकसित झाले होते. कंपनीने दावा केला आहे की ही बॅटरी खराब न होता -60 डिग्री ते 120 डिग्री सेल्सिअस तापमानात आरामात काम करू शकते. या अणुऊर्जेच्या बॅटरीपासून पर्यावरणाला कोणताही धोका नाही. बॅटरीचे आयुर्मान संपल्यानंतर बॅटरीचे 63 आयसोटोप्स तांब्याचे स्थिर आयसोटोप्स बनतात, जे किरणोत्सर्गी नसतात आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचवत नाहीत.