भीमा कोरेगाव दंगल झाली त्या दिवशी फडणवीस 40 किलोमीटरवर होते

 ‘भीमा कोरेगाव दंगल झाली त्या दिवशी 1 जानेवारीला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भीमा कोरेगावपासून 40 किलोमीटरवर नगर जिह्यात होते. त्यांच्या हेलिकॉप्टरने 11.30 ते 11.40 वाजता टेकऑफ केल्याची नोंद आहे. दंगल सकाळी झाली. त्यांना या दंगलीविषयी माहिती असती तर त्यांनी पुण्याला येऊन दंगलीचा आढावा घेतला असता. मात्र, त्यांना दंगलीची माहिती मिळालीच नाही. त्यामुळे हे प्रशासकीय स्तरावरचे अपयश आहे की राजकीय अपयश आहे, याची आयोगाने चौकशी करावी,’ अशी मागणी आपण आयोगापुढे केल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी नेमलेल्या आयोगापुढे प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी साक्ष नोंदविली. त्यानंतर पत्रकारांना याबाबत माहिती दिली. अनेकांनी भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची माहिती दाबून ठेवली आहे. त्याबाबत मी आयोगाला पुढील सुनावणीत दोन घटना सांगणार असल्याचे आंबेडकर म्हणाले.

रश्मी शुक्ला यांना समन्स टाळता येणार नाही

भीमा कोरेगाव आयोगापुढे पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचीही साक्ष नोंदविण्यात येणार आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, प्रकाश आंबेडकर म्हणाले, रश्मी शुक्ला यांना आयोग कधीही समन्स काढू शकतो. त्यांना समन्स टाळता येणार नाही. त्या आयोगासमोर का येत नाहीत, हे त्यांचे प्रतिज्ञापत्र आल्याशिवाय कळणार नाही.

‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचे आम्हाला निमंत्रण नाही

 ‘आमची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत युती आहे. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत आमचा समझोता नसल्यामुळे वंचित आघाडी महाविकास आघाडीचा घटकपक्ष नाही. ‘इंडिया’ आघाडीच्या उद्या मुंबईत होणाऱया बैठकीला निमंत्रण नसल्याने आम्ही जाणार नाही,’ असे प्रकाश आंबेडकर यांनी  पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘शिवसेनेसोबत असलो, तरी ‘इंडिया’च्या बैठकीसाठी निमंत्रण न आल्यामुळे आम्ही तिकडे जाणार नाही. आमची भूमिका शिवसेनेला सांगितली आहे. आमची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणून आहेत,’ असे ते म्हणाले.