यवतमाळ- बाईकचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 48 बाईक जप्त

प्रसाद नायगांवकर, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यामुळे पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी बाईकचोरीच्या प्रकारांना आळा घालण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने त्यानुसार कारवाई करत चोरी गेलेल्या 48 दुचाकीचा छडा लावला आहे. पोलिसांनी या बाईक चोरणाऱ्यांना अटक केली असून एक मोठी आंतरराज्य टोळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील दुर्गम भागातील ढाणकी – बिटरगाव या परिसरातून या आरोपींना अटक करण्यात आली आहे. एवढ्या मोठया प्रमाणावर चोरीच्या दुचाकी सापडण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. परजिल्ह्यातून दुचाकी आणून ग्रामीण भागात स्वस्त भावात गाड्या विकायच्या असा या टोळीचा धंदा होता.