ठाणे हादरले…भाजप आमदाराचा मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण शहर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची थरारक घटना घडली. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण शहर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची थरारक घटना रात्री उशिरा घडली. पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्येच गायकवाड यांनी गोळीबार केला. भाजप आणि शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला असून  गणपत गायकवाड यांनी मिंधे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर  4 गोळ्या झाडल्या. यामध्ये महेश गायकवाड यांना दोन गोळ्या लागल्या आहेत. त्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान गणपत गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं

उल्हासनगरमध्ये शुक्रवारी रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यात राडा झाला. यामध्ये गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला असून महेश गायकवाड यांच्यावर 4 गोळ्या झाडण्यात आल्या. या दोघांमध्ये फार जुना वाद होता. हा वाद मिटवण्यासाठी हे दोघे हिल लाईन पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी कार्यकर्ते, अंगरक्षक देखील होते.

मात्र पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्या बाचाबाची झाली. यावेळी गणपत गायकवाड यांनी आपली बंदूक काढली आणि 4 गोळ्या झाडल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षकासमोरच या गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या महेश गायकवाड यांना लागल्या तर दोन गोळ्या अंगरक्षकांना लागल्या, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. सध्या महेश गायकवाड यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.