पालिकेचे आज विक्रमी बजेट, तीन हजार कोटींची वाढ अपेक्षित; करवाढ टळणार, नव्या योजना नाहीत

मुंबई महानगरपालिकेचे विक्रमी बजेट आज 2 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. गेल्या काही वर्षांचा वाढणारा आकडा पाहता या वर्षीदेखील आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘विक्रमी’ बजेट ठरण्याची शक्यता आहे. कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, समुद्राचे पाणी गोडे करणे, सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांचा खर्च यामुळे गतवर्षीच्या 52 हजार 619.07 कोटींवर या वर्षीचा बजेट 55 हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी बजेटमध्ये 14.56 टक्क्यांची वाढ झाली होती.

अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे दुपारी 12 वाजता शिक्षण खात्याचे बजेट प्रशासक तथा आयुक्त इकबाल सिंह चहल यांना सादर करतील. तर दुपारी 1 वाजता अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आयुक्तांना महापालिकेचा एकूण अर्थसंकल्पीय अंदाज सादर करतील. या अर्थसंकल्पातून मुंबईकरांसाठी कोणत्या नव्या योजनांची घोषणा केली जाते, कोणत्या सवलती दिल्या जातात की करवाढ होते, याकडे सर्व मुंबईकरांच लक्ष लागले आहे. बजेट सादर झाल्यानंतर दुपारी 1 वाजता पालिका आयुक्त पत्रकार परिषदही घेणार आहेत. महापालिकेत सध्या निवडून आलेले सदस्य नसल्यामुळे पालिका कोणते नवे निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गतवर्षीच्या बजेटमध्ये शिळय़ा योजनांवर नव्या तरतुदी करण्यात आल्या होता. त्यामुळे या वर्षी तरी काही नव्या योजना आणल्या जातात का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.  मात्र आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याने मुंबईकरांवर कोणत्याही करवाढीचा बोजा पडणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुख्यालयातील सभागृह पुन्हा गजबजणार

महानगरपालिकेच्या नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपल्यामुळे मुख्यालयात गेल्या पावणेदोन वर्षापासून सभागृहाचे कामकाज झाले नाही. फक्त गणेशोत्सव स्पर्धांच्या बक्षीस वितरणासाठी काही तासांसाठी सभागृह उघडले गेले. मात्र आता बजेट सादर होणार असल्याने गेल्या दोन दिवसांपासून स्वच्छतेचे काम सुरू आहे.

अग्निशमन दल सक्षम करणार!

आपत्कालीन परिस्थितीत मुंबई अग्निशमन दलाची महत्त्वाची भूमिका असते आणि ती भूमिका अडीच हजार जवान जिवाची बाजी लावत बजावतात. अग्निशमन दलात मनुष्यबळ वाढवण्यात येत असून लवकरच 910 जवान तैनात करण्यात येणार आहे. संपूर्ण अग्निशमन दल सक्षम करण्याची तयारी पालिकेने केले आहे.

 अपेक्षित निर्णय

 अग्निशमन सेवेची दर्जोन्नती करणे

गलिच्छ वस्ती सुधारणा आणि त्याची दर्जोन्नतीबाबत ठोस उपाययोजना करणे

उद्यानांची दर्जोन्नती करणे, नव्याने विकसित झालेल्या प्रभागात उद्याने उभारणे,  शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता, दर्जामध्ये सुधारणा, भूमिगत मार्पेट, कोळीवाडय़ाचा विकास