मोबदला वाढीचे परिपत्रक निघेपर्यंत ऑनलाईन कामावर बहिष्कार; आशा स्वयंसेविकांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आवारात निदर्शने

गटप्रवर्तक महिलांना दरमहा 10 हजार रुपये मानधन, दरमहा आरोग्यवर्धिनीचे 1500 रुपये, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क व भाऊबीज तसेच आशा महिलांना दरमहा 7 हजार रुपये मानधन वाढ व भाऊबीज भेट देण्याचे परिपत्रक काढल्याशिवाय आशा कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरुच राहिल, असा इशारा देत महाराष्ट्र राज्य आशा, गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने सोमवारी रत्नागिरी जिल्हा परिषदेबाहेर निदर्शने केली.

शंकर पुजारी आणि सुमन पुजारी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आशा आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेबाहेर निदर्शने केली. आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान आपल्या मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी आरोग्यभवन मुंबई येथे कृतीसमिती सोबत बैठक घेऊन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना 200 रुपये दिवाळी भेट दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन दिले होते. आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात 7 हजार रुपयांची वाढ आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात 6 हजार रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन दिले होते.

गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ व्हावी याकरीता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ करण्यासाठी शिफारस केली. त्यावेळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गटप्रवर्तकांसाठी 6 हजार 200 वरून 10 हजार रुपयांची वाढ करण्याचे आदेश मुख्य सचिव मिलींद म्हैसकर यांना मोबाईलवरुन दिले. मात्र त्यानंतर दीड महिना होऊनही अद्याप शासननिर्णय झालेला नाही. जोपर्यंत या निर्णयांचे परिपत्रक निघत नाही तोपर्यंत ऑनलाईन कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी घेतला आहे.