अंधेरी, मालाड, मढ, गोराई, बोरिवलीतील वाहतूककोंडी फुटणार; महापालिका खाडीवर उभारणार केबल पूल

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी पूल आणि उन्नत मार्गाची उभारणी सुरू असताना आता मढ आणि वर्सोवादरम्यान असलेल्या खाडीवर मुंबई महापालिका केबल पूल उभारणार आहे. त्यामुळे मढ ते वर्सोवा प्रवास 10 मिनिटांत होणार असून अंधेरी, मढ, बोरिवली आणि गोराई भागातील वाहतूककोंडी मोठय़ा प्रमाणात कमी होणार आहे.

गोरेगाव मुलुंड लिंक रोड, वर्सोवा-दहिसर, दहिसर भाईंदरदरम्यान उन्नत मार्ग बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे तर मढ-वर्सोवादरम्यान असलेल्या खाडीवरून ये-जा करण्यासाठी फेरी बोटीने प्रवास करावा लागतो. मढ-वर्सोवा पुलासाठी महापालिकेच्या 1967 आणि 1991 सालच्या डीपीत तरतूद करण्यात आली होती. मात्र काही कारणांमुळे याबाबतचा निर्णय रखडला. मात्र आता मुंबई महापालिपेने पुलासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. पुलाला महाराष्ट्र किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने फेब्रुवारी 2023 मध्ये याला मंजुरी दिली तर नुकतीच सीआरझेडची परवानगी मिळाली आहे.

मढ-वर्सोवा केबल पुलासाठी मुंबई महापालिकेने निविदा जाहीर केली असून हा पूल पंत्राटदाराला पावसाळ्यातील कामासह तीन वर्षांत उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे.

वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या धर्तीवर पूल
वांद्रे-वरळी सागरी सेतू हा केबल पूल असून त्याच धर्तीवर मढ-वर्सोवा केबल पुलाची रचना केली जाणार आहे. 300 मीटर लांबीचा हा पूल असून या पुलाची उंची साधारण हजार फुटांची असणार आहे. पुलाच्या दोन पिलरमध्ये मोठे अंतर असून लहान बोटीसह मोठया शिडाच्या नौकाही या पुलाखालून ये-जा करू शकणार आहेत. त्यामुळे मच्छीमारांचेही कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नसल्यामुळे त्यांचाही या पुलाला विरोध नाही.

मढ गावात कोणी आजारी असेल तर त्याला रात्री-अपरात्री मुंबईत घेऊन जाणे मोठय़ा जिकरीचे काम असते. मात्र, नव्या पुलामुळे थेट वर्सोवा आणि वर्सोव्यावरून मुंबईतल्या कोणत्याही रुग्णालयात तातडीने पोहोचणे शक्य होणार आहे.
पूल उभारणीसाठी काही प्रमाणात कांदळवन तोडावे लागणार आहे. अशा वेळी पुलासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारची ना हरकत प्रमाणपत्रे पंत्राटदारालाच मिळवावी लागणार आहेत.