हुकूमशाहीला पुन्हा एकदा स्वीकारणे देशासाठी घातक; उद्धव ठाकरे यांचा इशारा

भारत राष्ट्र समितीचे जळगावचे जिल्ह्याध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी मजबूत होत असल्याचे सांगितले. आता जनतेते असंतोष असून जनता केंद्र सरकारला कंटाळली आहे. त्यामुळे राज्यात आणि देशात परिवर्तन घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यात आणि देशात मोदी सरकारविरोधात जनता असंतोष व्यक्त करत आहे. 10 वर्षात जनतेचा असंतोष मोठ्या प्रमाणात आणि उघडपणे व्यक्त होत आहे. शिवसेना नेहमी जनतेसोबत आहे. तसेच जनतेच्या भावना समजून त्याप्रमाणे आमचे काम सुरू असते. त्यामुळे भाजप, वंचित बहुजन आघाडी, भारराष्ट्र समिती( बीआरस) असे विविध पक्षातून नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या आशेने शिवसेनेत प्रवेश करत आहे.

बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे जळगावमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी विजयी होण्यासाठी हे सर्व प्रयत्न करणार आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यंदाच्या लोकसभेत लोकशाही विरोधात एकाधिकारशाही, हुकूमशाही यांची थेट लढत होणार आहे.

आता हुकूमशाहला पुन्हा एकदा स्वीकारणे देशासाठी घातक आहे. एककाळ असा होता की देशाला कणखर नेतृत्व हवे, असे वाटत होते. संमिश्र सरकार नको होते. मात्र, अटल बिहारी वाजपेयी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी संमिश्र सरकार उत्तमपणे चालवले होते. संमिश्र सरकारच्या काळात देशाची प्रगती झाली आहे. आम्हाला देश मजबूत पाहिजे, सरकार संमिश्र पाहिजे. एका व्यक्तीच्या हातात देश दिला तर तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही, हे जनतेला समजले आहे. त्यामुळे आम्हाला मजबूत सरकार पाहिजे पण ते संमिश्र हवे. सर्वांना सोबत नेणारा कणखर नेता पाहिजे. जो देईल साथ, त्यांचा करू घात, अशी व्यक्ती असा पक्ष आम्हाला नको आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

सर्वांना सोबत घेणारे आणि संमिश्र सरकार इंडिया आघाडी देऊ शकते. हे सरकार देशाला प्रगतिपथावर नेणार आहे. आपण अनुभवातून शिकतो. आपण संमिश्र सरकारचा अनुभव घेतला आहे. तसेच 10 वर्षे एक नेता, एक पक्ष याचाही अनुभव घेतला आहे. आता ते इतर पक्ष फोडून नेते स्वतःकडे घेत आहेत. देशात त्यांचा एकच पक्ष राहावा, असे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. देशात इतर पक्ष संपवण्यात येत आहे. ही वृत्ती घातक आहे. त्यामुळे एका व्यक्तीच्या हातात देश देणे धोकादायक आहे, असेही त्यांनी सांगितले.

देशात पुन्हा एकदा हुकूमशाही सरकार आले, तर स्वतःचे मत मांडायचे स्वातंत्र्यही राहणार नाही. त्यामुळे आम्हाला भारत सरकार हवे आहे. मोदी सरकार नको आहे. एका व्यक्तीचे सरकार हे आम्ही आणि देशवासीय मान्य करू शकत नाही. गेल्या 10 वर्षात त्यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी कोणतेही पूर्ण केलेले नाही. अच्छे दिन येणार, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येणार, तरुणांना रोजगार देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, देश भ्रष्टाचारमुक्त करणार, अशी अनेक आश्वासने त्यांनी दिली होती. त्यातील कोणतेही पूर्ण झाले नाही. इतर पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना स्वतःकडे घेत त्यांनी इतर पक्ष भ्रष्टाचारमुक्त केले, असा टोलाही त्यांनी लगावला.

महायुतीचे उमेदवार ठरलेले नाही. फॉर्म्युला ठरला नाही आणि ते सभा घेत आहे. त्याला अर्थ नाही. आमचे जागावाटप आणि फॉर्म्युला ठरला आहे. आता महाविकास आघाडीच्या एकत्रित सभाही सुरू होतील, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच जागावाटप झाल्याने प्रत्येक पक्षाने आपल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना समजवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणाऱ्यांना आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. त्यांना एवढी लोक भाड्याने का घ्यावी लागत आहे, त्यांच्या इंजिनाची चाके निखळी असून स्टेपनीवर त्यांची गाडी सरू आहे का, त्यांचे मूळचे नेते कोठे आहेत. आज शिवसेनेत येणारे त्यांचे अनेक नेते त्यांना का कंटाळले आहेत. याचा विचार त्यांच्या नेतृत्त्वाने त्यांच्या पक्षाच्या हितासाठी करावा, असेही ते म्हणाले.