टेनिसच्या नव्या सम्राटाचा उदय, पावणेपाच तासांच्या संघर्षानंतर अल्काराझला विम्बल्डनचे जेतेपद

आज विम्बल्डनच्या हिरवळीवर टेनिसच्या नव्या सम्राटाचा उदय झाला. विशेष म्हणजे 20 वर्षीय कार्लोस अल्काराझने नोव्हाक जोकोविचचे विम्बल्डनवरील वर्चस्व मोडीत काढताना पावणेपाच तास रंगलेल्या पुरुष एकेरीच्या संस्मरणीय अंतिम सामन्यात 1-6, 7-6(8-6), 6-1, 3-6, 6-4 अशी बाजी मारली आणि आपले हिरवळीवरील पहिले आणि कारकिर्दीतील दुसरे ग्रॅण्डस्लॅम जिंकले. अल्काराझच्या अद्भूत खेळामुळे जोकोविचचे 24वे विश्वविक्रमी ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाचे स्वप्न भंगले.

अल्काराझने गेल्या महिन्यात लाल मातीत झालेल्या उपांत्य लढतीत जोकोविचविरुद्ध केलेल्या चुका हिरवळीवर टाळल्या. त्या वेळी जोकोविचने चार सेटमध्ये अल्काराझचा सहज पराभव करत अंतिम फेरी गाठली होती आणि मग 23वे जेतेपदही पटकावले होते.

आज जोकोविचने भन्नाट सुरुवात करताना पहिला सेट 6-1 असा सुसाट जिंकला. या सेटमध्ये त्याने अल्काराझला हलूच दिले नाही. मात्र दुसरा सेट टायब्रेकरमध्ये खेळला गेला. तब्बल दीड तास चाललेल्या या सेटमध्ये अल्काराझने 7-6 (8-6) अशी बाजी मारत 1-1 अशी बरोबरी साधली. या संघर्षपूर्ण लढतीनंतर तिसऱया सेटमध्ये अल्काराझचाच जोर दिसला. हा सेट 6-1 असा जिंकत त्याने आघाडी घेतली. मात्र चौथ्या सेटमध्ये जोकोविचने आपला खेळ दाखवत सामना पाचव्या सेटमध्ये नेला. पाचव्या सेटमध्ये अल्काराझचा झंझावात जोकोविचपेक्षा भारी दिसला. तरीही जोकोविच त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होता; पण हृदयाचे ठोके चुकवणाऱया या सामन्यात अल्काराझच भारी ठरला आणि टेनिससम्राटाला हरवत टेनिसच्या नव्या राजकुमाराचा उदय झाला.

जोकोविचची हॅटट्रिक हुकली
जोकोविचने आपल्या 23 ग्रॅण्डस्लॅमच्या इतिहासात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये चक्क दोनदा हॅटट्रिक केली; पण विम्बल्डनच्या हिरवळीवर त्याला एकदाही त्या पराक्रमाची पुनरावृत्ती करता आली नाही. या वेळी त्याला हॅटट्रिकची संधी होती, पण ती हुकली. त्याने आजवर विम्बल्डन चक्क तीन वेळा राखले आहे.

अल्काराझचे दुसरे ग्रॅण्डस्लॅम
गेल्या वर्षी अमेरिकन स्पर्धेत अल्काराझने नॉर्वेच्या कॅस्पर रूडचा पराभव करत आपले पहिले ग्रॅण्डस्लॅम जिंकले होते. त्यानंतर तो फ्रेंच ओपनमध्ये खेळला, पण उपांत्य फेरीत जोकोविचने त्याचा पराभव केला होता. आता त्या पराभवाची सव्याज परतफेड करताना त्याने विम्बल्डन एकेरीचे पहिलेवहिले जेतेपद संपादले.