गॅस सिलिंडरच्या किमती वाढवून केंद्र सरकारची 30 लाख कोटींची नफेखोरी

पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 200 रुपयांची कपात करणाऱया पेंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षांत एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 185 टक्क्यांची भरमसाट वाढ केली असून आता फक्त 17.5 टक्के कपात केली आहे, तसेच गेल्या नऊ वर्षांत किमती अव्वाच्या सव्वा वाढवून केंद्र सरकारने तब्बल 30 लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. देशभक्त विरोधी पक्ष ‘इंडिया’ची पॉवर पाहून मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्याचा मजबुरीने निर्णय घ्यावा लागला आहे. खरेदी क्षमतेनुसार जगातील सर्वात महाग घरगुती गॅस हिंदुस्थानात मिळत आहे. देशात घरगुती गॅस सिलिंडरचे भाव 2014 मध्ये 400 रुपये प्रतिसिलिंडर होते. ते 2023 मध्ये 1140 रुपयांवर पोहोचले. सरकारने गेल्या नऊ वर्षांत 185 टक्क्यांनी किमती वाढवल्या, असे त्या म्हणाल्या.