मंत्रीपदाची संधी मिळणार की नाही म्हणून अनेकजण दु:खी!

जे मंत्री होणार होते ते आता आपल्याला संधी मिळणार की नाही याकरिता दुःखी आहेत. कारण प्रचंड गर्दी झाली आहे. आधीपासूनच सगळे नवीन ‘कोट’ शिवून बसले होते. मात्र आता या कोटचे काय करायचे हा प्रश्न आहे. एखाद्या सभागृहाची बैठक क्षमता वाढवता येईल, मात्र मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या वाढवता येत नाही, असा टोला केंद्रीय  मंत्री नितीन गडकरी यांनी आज लगावला. नागपुरातील सुरेश भट सभागृहात विद्यापीठ शिक्षण मंचाच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव सोहळय़ात ते बोलत होते.

शिंदे गट आणि भाजपच्या युती सरकारमध्ये नुकतीच राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांनी  मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे गटातील मंत्रीपदासाठी इच्छुक काही आमदार नाराज आहेत. गर्दी झाल्याने आपल्याला आता मंत्रीपदाची संधी मिळणार की नाही अशा संभ्रमात ते आहेत. त्या पार्श्वभूमीवर गडकरींनी केलेले हे विधान चर्चेचा विषय ठरले आहे.

गडकरी पुढे म्हणाले, आपल्याला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त मिळाले असे वाटणे म्हणजे समाधान आहे. सध्या नगरसेवक याकरिता दुःखी आहेत की, ते आमदार झाले नाही. आमदार याकरिता दुःखी आहेत की ते मंत्री झाले नाही. मंत्री याकरिता दुःखी आहेत की चांगले खाते मिळाले नाही आणि आता जे मंत्री होणार होते ते याकरिता दुःखी आहेत की आता आपल्याला संधी मिळणार की नाही. कारण प्रचंड गर्दी झाली आहे.