माझी तुझ्यावर नजर आहे! ‘चांद्रयान-2’च्या ऑर्बिटरने काढले विक्रम लँडरचे फोटो, इस्त्रोने दिली माहिती

हिंदुस्थानची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम ‘मिशन चंद्र’ यशस्वी झाली असून ‘चांद्रयान-3’च्या विक्रम लँडरने दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. चंद्रावर लँडिंग यशस्वी झाल्यानंतर आता ‘चांद्रयान-3’चा पुढील प्रवास सुरू झाला असून प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरपासून वेगळे करण्यात आले. प्रज्ञान रोव्हरने आपल्या कामालाही सुरुवात केली आहे. याच दरम्यान, ‘चांद्रयान-2’चे ऑर्बिटरही चंद्राच्या कक्षेमध्ये सक्रिय असून त्याने ‘चांद्रयान-3’च्या लँडरचे फोटो काढले आहेत. हे फोटो इस्त्रोने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने शुक्रवारी सकाळी काही फोटो शेअर केले. ‘चांद्रयान-2’च्या ऑर्बिटरने ‘चांद्रयान-3’च्या लँडरचे फोटो काढल्याचे इस्त्रोने सांगितले. ‘चांद्रयान-2’चे ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेमध्ये फिरत असून हाय रिझोल्युशन कॅमेऱ्याद्वारे त्याने हे फोटो टिपले आहेत. 23ऑगस्ट रोजी विक्रम लँडर चंद्रावर उतरले त्यानंतर काही वेळाने हे फोटो काढण्यात आल्याची माहिती इस्त्रोने दिली.

Isro shares images of Chandrayaan 3 lander, as taken by Chandrayaan 2 orbiter (Credits: Isro/Twitter)
हिंदुस्थानसाठी 23 ऑगस्ट हा दिवस ऐतिहासिक ठरला. सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी ‘चांद्रयान-3’सोबत अंतराळात गेलेले विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिन ध्रुवावर उतरले. यासह चंद्रावर अंतराळ यान यशस्वीरित्या उतरवणाऱ्या खास देशांमध्ये हिंदुस्थानचा समावेश झाला, तर दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा हिंदुस्थान पहिला देश ठरला.

विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर अडीच तासांनी प्रज्ञान रोव्हर त्यापासून वेगळे झाले. रोव्हरने चंद्रावर पृष्ठभागावर फेरफटकाही मारला. हे रोव्हर फक्त सूर्यप्रकाशात काम करू शकणार आहे. चंद्रावर पुढील 14 दिवस सूर्यप्रकाश असणार असून या काळात रोव्हर चंद्रावरील वातावरणाचा अभ्यास करेल.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरचे तापमान उणे 200 ते 230 डिग्री आहे. येथील पाणी बर्फाच्या स्वरूपात असण्याची शक्यता आहे. पण हे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही तसेच ऑक्सिजन, हायड्रोजन किती प्रमाणात आहे? याचा शोध रोव्हर मार्फत करण्यात येणार आहे.