चांद्रयान 3 : प्रज्ञान रोव्हरच्या मार्गात आला चार मीटर खोल खड्डा!

चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर, प्रज्ञान रोव्हर रोज नवी माहिती इस्रोला पाठवत आहे. आज चांद्रयान 3 ने टिपलेले काही फोटो इस्रोने ट्विट केले आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरु असलेल्या अभ्यासादरम्यान, प्रज्ञान रोव्हरसमोर चार मीटर खोल खड्डा आला. या खड्ड्याची चाहूल लागताच रोव्हरला सूचना पाठवण्यात आल्या. धोक्याची सूचना मिळताच रोव्हरने आपली दिशा बदलत दुसऱ्याबाजूने मार्गक्रमण केले.

ही घटना रविवारी 27 ऑगस्ट रोजी घडली. मात्र याची छायाचित्रे आज इस्रोने ट्विट केली आहेत. पहिल्या फोटोमध्ये नेव्हिगेशन कॅमेराद्वारे टिपलेला चार मीटर खोल खड्डा दिसत आहे. तर दुसऱ्यामध्ये रोव्हरने मार्ग बदलून दुसऱ्यामार्गाकडे कूच करताना दिसत आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे तापमानाची पाठवली माहिती

चंद्राच्या पृष्ठभागावरील थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट (ChaSTE) पेलोड, विक्रम, चांद्रयान 3 लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमानातील बदल समजून घेण्यासाठी दक्षिण ध्रुवाभोवतीच्या चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीच्या तापमानाची माहिती दिली आहे. विक्रमकडून आलेली माहितीवरून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पृष्ठभाग आणि पृष्ठभागापासून खोलीवर बदल दिसून येत आहे. येथील तापमान उणे 10 अंश सेल्सिअस ते उणे 60 अंश सेल्सिअसदरम्यान आहे, अशी माहिती इस्रोने दिली आहे.