Lok sabha election 2024 : उध्दव ठाकरे, शरद पवारांबद्दल लोकांमध्ये सहानुभूतीची लाट! – भुजबळ

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडल्यानंतरही भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातील निवडणूक जड जात असल्याचे दिसतेय. याचाच परिपाक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा धडाका लावण्यात आला आहे. मात्र एवढे करूनही जनमताचा कौल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बाजुने असल्याचे सूचक विधान अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले.

लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले असून या दोन्ही टप्प्यात भाजप बॅकफूटवर गेल्याची चर्चा सुरू आहे. या निमित्ताने ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान छगन भुजबळ म्हणाले की, एनडीएसाठी ही निवडणूक सोपी नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या जाहीर सभांना ज्याप्रकारे लोकांची गर्दी होत आहे, त्यावरून त्यांच्याप्रती लोकांमध्ये सहानुभूती असल्याचे दिसते, असे म्हटले.

बारामतीमध्ये पवार कुटुंबियांमध्ये होत असलेल्या लढतीवरही भुजबळ यांनी भाष्य केले. माझ्यासाठी तरी हा दु:खद प्रकार होता. एका कुटुंबात वर्षानुवर्ष एकत्र राहिल्यानंतर हा जो काही प्रकार होतोय, तो अनेकांना पटलेला नाही. चूक कोणाची हा भाग वेगळा असून जे घडतेय ते चांगले झाले नाही, असे भुजबळ म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

नाशिकमधून माघार का?

निवडणुकीचे दोन टप्पे झाले तरी महायुतीकडून नाशिक लोकसभेचा उमेदवार जाहीर झालेला नाही. येथे छगन भुजबळ यांच्याही नावाची चर्चा होती, मात्र त्यांनी माघार घेतली. यावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझे नाव सुचवले होते आणि तशी मी तयारीही केली होती. मात्र इतर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होत असताना नाशिकचा निर्णय मात्र ताटकळला होता. माझ्यामुळे महायुतीमध्ये अडचण नको म्हणून मी माघार घेतली.

अतिथी देवो भव! नरेंद्र मोदींचे तुतारी वाजवून स्वागत करू; सुप्रिया सुळे यांचा टोला