अरुणाचल प्रदेशही आपलाच असल्याचा चीनचा दावा

चीन हा सातत्याने हिंदुस्थानसोबत आगळीक करत असून हिंदुस्थानी प्रदेश बळकावण्याचे काम चीन करतोय. चीनने आता तर हद्द केली आहे. अरुणाचल हा चीनचा भाग असल्याचे चीनने दाखवले आहे. चीनने एक नकाशा प्रसिद्ध केला असून त्यात हिंदुस्थानचा अरुणाचल प्रदेश हा चीनचा हिस्सा असल्याचे दाखवण्यात आले आहे. चीनने प्रसिद्ध केलेल्या नवीन नकाशात तैवानसह अनेक क्षेत्रांवर चीनने आपला दावा सांगितला आहे. हिंदुस्थानसाठी चिंतेची बाब ही आहे की चीनने अरूणाल प्रदेश हा देखील चीनचाच भाग असल्याचे म्हटले आहे. एकीकडे शांततेसाठी चर्चेच्या गोष्टी करणारा चीन कागदावर आणि प्रत्यक्षात हिंदुस्थानी सीमांमध्ये घुसला असून चीनचे हे घुसखोरीचे धोरण थांबता थांबत नाहीये.

चीनचे राष्ट्राध्यक्ष हे येत्या काही दिवसांत जी-20 परिषदेत सहभागी होणार आहेत. जी-20 चे आयोजन हिंदुस्थानात करण्यात आले असून यात चीनसह विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, प्रमुख नेते, राजदूत, उद्योगपती सहभागी होणार आहेत. अलीकडेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची आणि हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने भेट झाली होती. या भेटीमध्ये पंतप्रधानांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांचा देश करत असलेल्या घुसखोरीबद्दल का ठणकावलं नाही असा सवाल विरोधकांनी विचारला आहे.

ग्लोबल टाइम्स हे चीनमधील सरकारी वृत्तपत्रर असून त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “चीनचा नकाशा अधिकृतपणे सोमवारी प्रसिद्ध करण्याच आला. नैसर्गिक संसाधन मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या विभागाने हा नकाशा संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. हिंदुस्थानचा भूभाग हा आपलाच आहे असं दादागिरी करत सांगण्याची चीनची ही पहिली नेळ नाहीये. एप्रिल 2023 मध्येही चीनने हिंदुस्थानचा हिस्सा असलेल्या अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावं बदलण्यास मंजुरी दिली होती. ग्लोबल टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार चीनने तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीन सागराचा भागही चीनमध्ये दाखवला आहे. तसेच नाइन-डॅश लाईनवरही चीनने आपला दावा सांगतला आहे.