मरीन ड्राइव्हवरून सागरी मार्गाने अवघ्या बारा मिनिटांत वांद्रय़ाला

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणारे कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सील लिंक उद्या पहाटे 25 हजार मेट्रिक टन वजनाच्या व 136 मीटर लांबीच्या महाकाय गर्डरने जोडले जाणार आहेत. यामुळे पुढील काही दिवसांतच वाहनचालकांना मरीन ड्राईव्ह ते वांद्रे या ठिकाणी रस्ते मार्गाने जाण्यासाठी लागणारा पाऊण तासाचा प्रवास केवळ बारा मिनिटांत होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील आणि पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱया ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ सागरी मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून एकूण 88 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सी लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे, तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा 4.5 किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी लिंक जोडला जाणार आहे.
असे होणार काम

वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी पिलर 7 व पिलर 9 च्या मध्ये हा गर्डर बसवण्यात येणार आहे. हा गर्डर बसवणे कोस्टल रोड प्रकल्पातील सर्वाधिक आव्हानात्मक काम आहे. अरबी समुद्रात भरती व ओहोटीचा अंदाज घेऊन हा गर्डर बसवण्यात येणार आहे. उद्या पहाटे 4 ते सकाळी 7 या वेळेत हा गर्डर बसवण्यात येणार आहे.

70 टक्के वेळ, 34 टक्के इंधन वाचणार

z गर्डर जोडणीनंतर वरळी येथून कोस्टल रोड सी लिंकला जोडला जाणार आहे. त्यामुळे लवकरच वांद्रय़ाहून दक्षिण मुंबईत प्रवास करता येणार आहे. यामुळे दक्षिण मुंबई, पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडी कमी होईल. सध्या 12 मार्चपासून कोस्टल रोडवर 9 किमी मार्गावर तीन लेनच्या एका मार्गिकेने वरळी ते मरीन ड्राईव्ह असा प्रवास करता येत आहे.

z शिवाय मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सी लिंकपर्यंत सिग्नलमुक्त, करमुक्त वेगवान प्रवास होणार आहे. यात वेळेची 70 टक्के आणि इंधनाची बचत 34 टक्के होणार आहे. पर्यायाने वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, कार्बन उत्सर्जन कमी होणार असल्याने पर्यावरण संवर्धनासाठी फायदा होणार आहे.

100 वर्षांची गॅरंटी

गर्डरला जपानी तंत्रज्ञानाने कोटिंग करण्यात आले असून पुढील 25 ते 30 वर्षे गंज पकडणार नाही. तसेच तो पुढील 100 वर्षे टिकेल, इतका मजबूत आहे.