सांगली सिव्हीलचे अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांचे निलंबन करण्याची काँग्रेसची मागणी

गोरगरीब रुग्णांचा आधार असणाऱया सांगलीच्या सिव्हील हॅस्पिटलला सिटी स्कॅन मशीन खरेदीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी वेळेत मशीनची खरेदी न केल्याने हा निधी शासनाकडे परत गेला आहे. त्यामुळे अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांच्यावर निलंबनाची किंवा त्यांच्या बदलीची कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस अशोक मासाळे यांनी केली आहे.

याबाबत सिव्हील प्रशासनाला त्यांनी निवेदन दिले असून, संबंधित खात्याचे मंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱयांकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे मासाळे यांनी सांगितले. सांगलीच्या सिव्हील हॅस्पिटलसाठी 27 मार्च 2022 रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाने सिटी स्कॅन मशीन देण्यासाठी हाफकीन या कंपनीला निधी वर्ग केला होता. हा निधी वर्ग झाल्यानंतर अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांच्यासह सिव्हील प्रशासनाने हे मशीन खरेदीसाठी तसेच ते बसवण्यासाठी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे 30 मे 2023 रोजी सिटी स्कॅन मशीनसाठी आलेला निधी शासनाकडे परत गेला आहे. याला अधिष्ठाता डॉ. नणंदकर जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करावे किंवा त्यांची अन्यत्र बदली करावी, अशी मागणीही मासाळे यांनी केली.

अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांच्या भोंगळ कारभाराबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात येणार असल्याचे मासाळे यांनी सांगितले. यावेळी मासाळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सिव्हील परिसरात जोरदार निदर्शने केली. यावेळी सांगली सिव्हीलचे सहायक अधिष्ठाता डॉ. देवकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी राज्य प्रवक्ते संतोष पाटील, सर्जेराव पाटील, अनमोल पाटील, सुशांत कदम, बाजीराव गस्ते, सचिन आरवाळे, सचिन काटकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.