मुंबईत महाविकास आघाडीचे वादळ; प्रचंड मिरवणूक…

‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ आणि ‘महाविकास आघाडीचा विजय असो’ अशा गगनभेदी घोषणांनी आज वांद्रे जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला. निमित्त होते महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचे. आज शिवसेनेचे अमोल कीर्तिकर यांनी उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी तर काँग्रेसचे भूषण पाटील यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी वांद्रे पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पाठिंब्यासाठी हजारोंच्या संख्येने आलेले कार्यकर्ते आणि नागरिकांमुळे वांद्रय़ात अक्षरशः महाविकास आघाडीचे प्रचंड वादळच निर्माण झाले. यावेळी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अर्ज भरण्यासाठी जाताना शिवसेनेकडून अमोल कीर्तिकर यांच्या रॅलीला गोरेगाव पूर्व, आरे रोड स्नेहदीप येथून सुरुवात झाली. त्यांनी सर्वप्रथम शिवतीर्थ येथे जाऊन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसही चैत्यभूमीवर जात वंदन केले. त्यानंतर वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला.

शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते व आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना नेते व आमदार सुनील प्रभू, आमदार विलास पोतनीस, खासदार प्रियांका चतुर्वेदी, आमदार ऋतुजा लटके, शिवसेना व युवासेना सचिव वरुण सरदेसाई, काँग्रेसचे माजी आमदार सुरेश शेट्टी, अशोक जाधव, बलदेव खोसा, माजी मंत्री व आमदार अस्लम शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अजित रावराणे, महिला विभाग संघटक राजुल पटेल, साधना माने, समाजवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी, ‘आप’ पक्षासह महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मिरवणुकीत संस्कृतीचे दर्शन

अमोल कीर्तिकर अर्ज भरण्यासाठी जाताना काढलेल्या भव्य मिरवणुकीत ढोलताशांचा गजर करण्यात आला. यावेळी भगवे फेटे, भगव्या साडय़ा, सदरे, उपरणी परिधान करून शिवसैनिक, महिला आघाडी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. वर्सोवा येथील कोळी बांधव आणि आरे कॉलनीतील आदिवासी बांधवही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी ही लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी असून यात लोकशाहीचा विजय होईल, असा विश्वास अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केला.

 

भूषण पाटील यांनाही जोरदार प्रतिसाद

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढलेल्या मिरवणुकीत नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. यावेळी आमदार भाई जगताप, आमदार अस्लम  शेख, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी मंत्री सुरेश शेट्टी, मुंबई काँग्रेस कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, प्रवक्ते सचिन सावंत, शिवसेना माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, शिवसेनेच्या उपनेत्या संजना घाडी, संजय घाडी, सुजाता शिंगाडे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी सांगली येथील जाहीर सभेला संबोधित करण्यापूर्वी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी तेजस ठाकरे, शिवसेना उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे आदी उपस्थित होते.