कोरोना लस आणि हार्ट अटॅकचा थेट संबंध आहे का? आयसीएमआरच्या अहवालात खुलासा

हिंदुस्थानात कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोरोना महामारीच्या संक्रमणानंतर अशा घटनांमध्ये वाढ झाल्याने याचा कोरोनाशी संबंध असावा का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनीही काही काळापूर्वी उत्तर दिलं होतं. आता कोरोना लसीचा आणि हृदयविकारांचा संबंध आहे का, याबाबत इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरच्या अहवालात खुलासा करण्यात आला आहे.

गुजरात राज्यात काही दिवसांपूर्वीच गरबा खेळताना अनेक तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनांचा मागोवा घेतल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेत एका अहवालाचा संदर्भ देत ज्यांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे, त्यांनी त्याच्या दोन वर्षंतरी अधिक शारीरिक मेहनत करू नये असा सल्ला दिला होता. त्यानंतर आता आयसीएमआरचा अहवाल उघड झाला असून त्यात हृदयविकाराचा झटका आणि कोरोना लसीच्या परस्परसंबंधाविषयी खुलासा करण्यात आला आहे.

या अहवालानुसार, देशात कोरोना लसीमुळे तरुणांमधील अचानक मृत्युचा धोका उद्भवलेला नाही. अनेक असे घटक आहेत, ज्यामुळे अशा आकस्मिक मृत्यूंची शक्यता वाढली आहे. कोरोना काळात दीर्घ काळ रुग्णालयात दाखल असणे, कुटुंबातील एखाद्या व्यक्तिचा अचानक मृत्यू होण्याचा वैद्यकीय इतिहास असणे, जीवनशैलीतील बदल, प्रचंड शारीरिक मेहनत, व्यसने अशा घटकांमुळे आकस्मिक मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे. हा अहवाल 18 ते 45 वर्षं वयोगटातील लोकांच्या वैद्यकीय इतिहासाच्या माध्यमातून करण्यात आला, ज्यांचा ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2023 या दरम्यान अचानक मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्युमागील कारणं स्पष्ट झाली नव्हती.