दूधगंगा पतसंस्था अपहाराचा नगर आर्थिक गुन्हे शाखा करणार तपास

संगमनेरमधील बहुचर्चित दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या 81 कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणाचा तपास आता नगर आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. दरम्यान, याप्रकरणी अटकेत असलेल्या पाचही आरोपींना न्यायालयाने आज न्यायालयीन कोठडी दिली आहे.

संगमनेरमधील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत 81 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 21 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्राथमिक तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केला होता. मात्र, गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता, अपहाराची रक्कम आणि आरोपींची संख्या मोठी असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हा गुन्हा शहर पोलिसांकडून काढून नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आज वर्ग केला आहे.

या प्रकरणात अटकेत असलेले लहानू गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते या तीन रोखपालांसह अमोल प्रकाश क्षीरसागर या वैधानिक लेखापरीक्षक आणि व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपली. तसेच हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्याने पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांनी आरोपींना वाढीव पोलीस कोठडी मिळण्यासाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले होते. मात्र, न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळत आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी बँकेचा अध्यक्ष, राजकीय नेता भाऊसाहेब कुटे आपल्या कुटुंबीयांतील आरोपींसह अद्यापि पसार आहे.