दारणा 56, भावली धरण 62 टक्के भरले

शनिवारी दारणाच्या पाणलोटात दुपारनंतर पावसाचे जोरदार आगमन झाले. दारणा धरण 56, भावली 62 तर मुकणे 50 टक्के भरले आहे.

शनिवारी दुपारी 3 वाजल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. धरणाच्या घोटी, इगतपुरीच्या घाटमाथ्यासह दारणाच्या भिंतीजवळही पावसाने जोर धरला होता. गेल्या आठवडाभरापेक्षा पावसाचा जोर घाटमाथ्यासह अन्य धरणांच्या पाणलोटातही वाढला. नाशिकचा दारणा समूह व नगर जिह्यातील भंडारदरा 15 ऑगस्टपूर्वी ओव्हरफ्लो होऊ शकतील, अशी सध्याची परिस्थती आहे.

दारणाचा साठा 56 टक्क्यांपर्यंत पोहचला असून, 7 टीएमसीच्या धरणात 4 टीएमसी पाणीसाठा झाला होता. मुकणे धरणात 50.12 टक्के, तर भावली धरण 62 टक्क्यांवर पोहचले आहे. गंगापूर 38.49 टक्के आहे. कश्यपी 20.90 टक्के, गौतमी गोदावरी 15.31 टक्के असा पाणीसाठा आहे. कडवात 25.36 टक्के, आळंदीत 4.29 टक्के पाणीसाठा आहे.

भंडारदरा 62 टक्के पाणीसाठा

भंडारदरा धरणात शनिवारी सायंकाळपर्यंत 115 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या धरणात पाणीसाठा 7370 दलघफू (67 टक्के) झाला होता. शनिवारी दिवसभर भंडारदरात 21 मिमी पावसाची नोंद झाली. निळवंडे धरणात 42 दलघफू पाणी आले. पाणीसाठा 2405 दलघफू (29 टक्के) झाला होता.

मुळा धरणात 47 दलघफू पाणी नव्याने दाखल झाल्याने काल सकाळी धरणातील पाणीसाठा 10326 दलघफू (39.72) झाला होता. तर कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 2247 क्युसेकने सुरू होता. त्यामुळे मुळा धरणातील पाणीसाठा आज 40 टक्क्यांवर पोहचणार आहे.

24 तासांत नोंदवला गेलेला पाऊस मिमीमध्ये भंडारदरा 30, घाटघर 68, पांजरे 59, रतनवाडी 69, वाकी 19.