मुंबई – बड्या अधिकाऱ्याची मुलगी ड्रायव्हरसोबत पळून गेली

19 वर्षांच्या तरुणीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी एका 35 वर्षांच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. बजरंग मौर्या असं या व्यक्तीचे नाव असून तो ड्रायव्हर आहे. ज्या तरुणीला पळवून नेल्याचा त्याच्यावर आरोप आहे ती तरुणी एका बड्या सरकारी अधिकाऱ्याची मुलगी आहे. ही तरुणी लंडनमध्ये शिकत असल्याचे कळाले आहे. हा ड्रायव्हर दुसऱ्या एका अधिकाऱ्याकडे कामाला आहे. 13 जानेवारीला तरुणी लंडनला जायला निघालेली असताना ती अचानक पळून गेली होती.

पोलिसांनी बजरंग आणि या तरुणीचा शोध घेतला आणि या दोघांना कळव्यातून ताब्यात घेतले. यावेळी या दोघांनी पोलिसांना सांगितले की त्यांनी लग्न केले आहे. पोलिसांनी या दोघांना पोलीस ठाण्यात आणले आणि मुलीला तिच्या कुटुंबियांच्या हवाली केले. बजरंगला पोलिसांनी बसवून ठेवत चौकशी केली.

चौकशीदरम्यान पोलिसांना कळाले की अधिकाऱ्याची तरुणी बजरंगसोबत पळून गेली होती. पोलिसांनी बजरंगविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. लंडनमध्ये शिकत असलेली ही तरुणी डिसेंबर महिन्यात घरी आली होती. पुन्हा लंडनला जात असताना तिच्या घरचे तिला सोडायला सोबत जात होते. यावेळी या तरुणीने ताडदेव इथे गाडी थांबवली आणि आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत असे सांगून ती तिथून गेली ती परत आलीच नाही. तरुणीचा फोनही बंद येत असल्याने तिच्या घरच्यांनी पोलिसांना धाव घेतली. आपली मुलगी ड्रायव्हरसोबत पळून गेल्याचे कळताच घरच्यांनी बजरंगविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.