IPL 2024 – गतपराभवाचा बदला घेण्यासाठी चेन्नईची आज पंजाबवर स्वारी

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी (दि.5) दोन लढती रंगणार आहेत. दुपारच्या सत्रात चेन्नई सुपर किंग्ज व पंजाब किंग्ज भिडणार आहेत. तर, रात्री कोलकाता नाईट रायडर्स व लखनौ सुपर जायंट्स यांच्यात महामुकाबला होणार आहे. साखळी फेरीचा उत्तरार्ध सुरू असल्याने आता प्ले ऑफच्या शर्यतीत चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळेच चेन्नई व पंजाब यांच्यातील उद्याची लढत त्यांच्या अस्तित्वाची लढत असणार आहे. यावेळी चेन्नईचा संघ गतपराभवाचा बदला घेण्यासाठी पंजाबच्या स्वारीवर धर्मशाळा येथे डेरेदाखल झाला आहे.

पंजाबने मागील सामन्यात चेन्नईचा त्यांच्या घरात घुसून 7 फलंदाज राखून पराभव केला होता. त्यामुळे त्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने चेन्नईचा संघ पंजाबवर चाल करून गेलाय. पंजाबने आधी कोलकाता व नंतर चेन्नईचा पराभव केला. त्यामुळे त्यांची नजर आता विजयाच्या हॅट्ट्रिकवर असेल. उभय संघांच्या 4-4 लढती शिल्लक असल्याने एक-एक पराभव त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीतून दूर घेऊन जाणार आहे. याची दोन्ही संघांना कल्पना आहे.

पंजाबची मदार जॉनी बेयरस्टो व शशांक सिंह यांच्यावर असेल, तर चेन्नईला कर्णधार ऋतुराज गायकवाड व शिवम दुबे या फलंदाजांकडून आशा असेल. गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास पंजाबसाठी अर्शदीप सिंह व हर्षल पटेल महत्त्वाचे गोलंदाज असतील. हे दोघे चालले, तर पंजाबचा विजय निश्चित असेल. चेन्नईसाठी मथिशा पथिराना ट्रम्प कार्ड ठरू शकतो. त्यामुळे या बेबी मलिंगापासून पंजाबच्या फलंदाजांना सावध राहावे लागणार आहे.

पंजाब किंग्ज – प्रभासिमरन सिंह, जॉनी बेयरस्टो, राइली रुसो, शशांक सिंह, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा, आशुतोष शर्मा, हरप्रीत बरार, राहुल चहर, हर्षल पटेल, कॅगिसो रबाडा

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, समीर रिजवी, मोईन अली, एमएस धोनी, डॅरिल मिचेल, दीपक चहर, मथिशा पथिराना, रिचर्ड ग्लीसन.