त्या पोलीस अंमलदाराच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण; रेल्वे पोलिसांचा तपास सुरू

लोकल प्रवासावेळी माटुंगा-शीव दरम्यान गैरकृत्य घडले होते, असे पोलीस अंमलदार विशाल पवार यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले होते. मात्र, या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. मुळात सदर ठिकाणी व पवार यांनी सांगितलेल्या वेळी फटका मारून मोबाईल पाडल्याची व झटापटीची घटना घडलीच नसल्याचे रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे.

27 एप्रिलच्या रात्री पोलीस अंमलदार विशाल पवार हे लोकलने प्रवास करीत असताना त्यांच्या हातावर फटका मारून मोबाईल खाली पाडल्याची तसेच आरोपींसोबत त्यांची झटापट झाल्याचा गुन्हा ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. हा गुन्हा रेल्वे पोलिसांकडे वर्ग होण्याआधीच पवार यांचा मृत्यू झाला. कोपरी पोलिसांकडून गुन्हा रेल्वे पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर वेगवेगळ्या रेल्वे स्थानके, फलाट परिसर, रेल्वे ब्रीज, आदी ठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्यास रेल्वे पोलिसांनी सुरुवात केली. पवार यांनी जबाबात नोंदवलेल्या वेळी व त्यानंतरही विशाल पवार हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये वैध झाल्याप्रमाणे दादर, माटुंगा रेल्वे स्थानक परिसरात दिसून आले. तसेच माटुंगा-शीव रेल्वे स्थानक दरम्यान फटका मारून मोबाईलची चोरी व त्यांच्यातील झटापटीची घटना घडली नसल्याचे दिसून येत असल्याचे रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे.