माता न तू वैरिणी, आईकडून अल्पवयीन मुलीची राजस्थानात विक्री, पोलिसांच्या सतर्कतेने डाव उधळला

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पोटच्या अल्पवयीन मुलीची तिच्या आईने आणि मामाने राजस्थान येथे विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला. पण पोलिसांच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आला . आता यवतमाळ पोलिसांनी आरोपी आईसह सहा आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत .

राजस्थानमध्ये दर हजारी पुरुषांच्या मानाने स्त्रियांचे प्रमाण हे अत्यल्प आहे. राजस्थानमध्ये मुलींची कमतरता असल्याने या भागात मुलींना मोठी मागणी आहे. पैसे देऊन मुली खरेदी करण्याचा प्रकार होतो. अशाच एका अल्पवयीन मुलीची तिची आई व मामा या दोघांनी केवळ एक लाख रुपयांत विक्री केली. मुलीचा यवतमाळातील मामाच्या घरी मुलासोबत विवाह करण्यात आला. नंतर हा प्रकार उघड होऊ नये म्हणून मुलीचे व तिच्या आईचे बनावट आधार कार्ड तयार करण्यात आले. यवतमाळ शहर पोलिसांना याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री धामणगाव रोडवर सापळा रचून मुलीसह सात जणांना रंगेहात पकडले आहे.

अकोला शहरातील शिवणी भागात राहणाऱ्या महिलेने तिच्या मुलीची राजस्थानातील एका मुलाला विक्री केली. या व्यवहारात या महिलेचा भाऊ अन्सार खान तस्वर खा पठाण याचा सहभाग आहे. मुलीचा विवाह राजस्थानातील शंकरसिंह सोहन सिंग याच्यासोबत लावण्यात आला. मुलीला धामणगाव मार्गे राजस्थानात नेण्यात येत असल्याची माहिती शहर ठाण्यातील जमादार रावसाहेब शेंडे यांना मिळाली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता ठाणेदार सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात तातडीने कारवाई हाती घेण्यात आली. धामणगाव मार्गावर सापळा लावला तसेच काही अंतरावर नाकाबंदी करण्यात आली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हिरव्या रंगाचे वाहन धामणगाव मार्गावर पोहोचले. तयारीत असलेल्या पोलीस पथकाने वाहन ताब्यात घेतले. यामध्ये मुलीसह सातजण हाती लागले. पोलिसांनी आरोपीना लगेच बेड्या ठोकल्या. राजस्थानातील मुलगा हिंदू असून, त्याची नवरी हिंदूच आहे, हे दाखवि-ण्यासाठी बनावट आधार कार्ड तयार करण्यात आले. अब्दुल कमरुद्दीन भडमुंजा याने अल्पवयीन मुलगी व तिच्या आईचे सविता दीपक अग्रवाल, कविता दीपक अग्रवाल या नावाचे बनावट आधार कार्ड तयार केले. एकूणच आंतरराज्यीय टोळी अल्पवयीन मुलीची विक्री करताना हाती लागली.आहे .

या प्रकरणी मुलीच्या जबाबावरून जमादार रावसाहेब शेंडे यांनी तक्रार दिली. सहाही आरोपींविरुद्ध कलम ३७० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसपी डॉ. पवन बनसोड, अपर अधीक्षक पीयूष जगताप, उपअधीक्षक रामेश्वर वैजने यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सतीश चवरे, शोध पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक संजय आत्राम, धीरज राजूरकर, रावसाहेब शिंदे, अश्विन पवार, मिलिंद दरेकर, सूरज साबळे, गौरव ठाकरे, दत्ता पवार यांनी ही कारवाई केली.