ICC T20 World Cup 2024: वेस्टइंडीज जिंकण्याची शक्यता कमी; जाणून घ्या आतापर्यंतचे योगायोग…

ICC T20 World Cup 2024 यंदाचे सामने वेस्टइंडीज आणि अमेरिकेत होत आहेत. या स्पर्धेबाबत आतापर्यंत असे योगायोग घडले आहेत की, ज्यामुळे यंदा वेस्टइंडीज संघ जिकण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. आजपर्यंत या स्पर्धेत ज्या देशात सामने खेळवले गेले तो देश म्हणजे यजमान संघ कधीही विजेता ठरलेला नाही. त्यामुळे हा योगायोग यंदाच्या स्पर्धेतही कायम राहणार की दोन वेळचा विजेता वेस्टइंडीज संघ चषकावर नाव कोरणार, याची चर्चा क्रिकेटरसिकांमध्ये रंगली आहे.

आतापर्यंत टी- 20 विश्वचषकाच्या 8 स्पर्धा झाल्या आहेत. 2007 मध्ये पहिल्यांदा झालेल्या या स्पर्धेचे यजमानपद दक्षिण आफ्रिकेने भूषवले होते. तर याआधी 2022 मध्ये या स्पर्धा इंग्लंडमध्ये झाल्या होत्या. यंदा या स्पर्धा अमेरिका- वेस्ट इंडीजमध्ये होत आहेत. आतापर्यंत झालेल्या या स्पर्धेतील योगायोग असा आहे की यातील यजमान देश कधीही विजेता झालेला नाही.

2007 मध्ये दक्षिण आफ्रिका यजमान होता, त्या स्पर्धेत टीम इंडिया विजेता ठरला होता. 2009 मध्ये इंग्लंड संघ यजमान होता, त्या स्पर्धेत पाकिस्तान विजेता ठरला होता. 2010 मध्ये झालेल्या स्पर्धेत इंग्लंज विजेता ठरला होता. तर 2012 मध्ये श्रीलंका यजमान होता. तेव्हा वेस्टइंडीजचा संघ विजेता झाला होता. 2014 मध्ये बांगलादेश यजमान होता. त्या स्पर्धेत श्रीलंका विजेता ठरला होता. 2016 मध्ये हिंदुस्थानकडे यजमानपद होते. त्यावेळी वेस्टइंडीज विजेता ठरला होता. 2021 मध्ये यूएईमध्ये स्पर्धा झाल्या होत्या. त्यावेळी ऑस्ट्रेलिया विजेता ठरला होता. तर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेत इंग्लंड विजेता ठरला होता. त्यामुळे आतापर्यंत असलेला हा योगायोग यंदाही कायम राहणार की वेस्टइंडीज नवा विजयाचा योग साधणार, अशी चर्चा क्रिकेटरसिकांमध्ये होत आहे.