पाकिस्तानसोबत मॅच हरल्यास प्रत्येक खेळाडूला ‘टोयोटा कार’, दाऊदने दिली होती ऑफर

पाकिस्तान सोबत क्रिकेट मॅच हरण्यासाठी दाऊद इब्राहिमने टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला आलिशान टोयोटा कार देण्याची ऑफर दिली होती. हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी केलेल्या या दाव्याने खळबळ उडवून दिली आहे.

खरंतर क्रिकेट आणि अंडरवर्ल्डचे खूप जुने नाते आहे. 1987 मध्ये शारजाह येथे हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान एक मालिका सुरु होती. त्यावेळेस अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा स्वतः टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये आला आणि हिंदुस्थानी खेळाडूंना म्हणाला की उद्या जर तुम्ही पाकिस्तानला हरवले तर मी प्रत्येक खेळाडूला आलिशान ‘टोयोटा कार’ भेट देईन. कपिल देव यांनीही इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत या घटनेची माहिती दिली.

दाऊद इब्राहिमची टोयोटा कारची ही ऑफर टीम इंडियाने नाकारली होती. हा खुलासा माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी देखील केला होता जे स्वतः त्या संघाचा एक भाग होते. बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांनीही त्यांच्या “आय वॉज देअर – मेमोयर्स ऑफ अ क्रिकेट अ‍ॅडमिनिस्ट्रेटर” या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे.

दिलीप वेंगसरकर यांनी जळगावातील एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होते की, पत्रकार परिषद संपवून कपिल देव ड्रेसिंग रूममध्ये आले. त्यांना टीम इंडियाच्या खेळाडूंशी बोलायचे होते. यावेळी कपिल देव यांची नजर दाऊदवर पडताच त्यांनी विचारले की हा कोण आहे? आपण बाहेर जाऊया कपिलचे हे शब्द ऐकून दाऊद रागाच्या भरात ड्रेसिंग रूममधून बाहेर आला आणि म्हणाला, आता ही गाडीची ऑफर रद्द झाली आहे. कपिल देव यांनीही इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणाची माहिती दिली.

यावेळी वेंगसरकर यांनी सांगितले की, या घटनेनंतर पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियांदाद त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये आला. यावेळी तो म्हणाला की, तुम्हाला कदाचित माहीत नसेल मात्र तो दाऊद इब्राहिम आहे. कपिलला यामुळे काही समस्या निर्माण होतील. यावर वेंगसरकर म्हणाले की, कपिलसाठी कोणीही कोणतीही अडचण निर्माण करू शकत नाही. ना हिंदुस्थानात ना बाहेर.

यावेळी रवी शास्त्री म्हणाले की दाऊदची ओळख पटली तेव्हा कपिल देव यांनी जाऊन दाऊदची माफी मागितली. रवी शास्त्री म्हणाले की, दाऊद अनेकदा यायचा. तो शारजालाही आला होता. त्याच्या येण्याआधीच मला ही गोष्ट कळली आणि मी चहाच्या बहाण्याने तिथून निघून गेलो. नंतर कपिलने दाऊदकडे जाऊन माफी मागितली. त्यावेळी संघाचा भाग असलेला फिरकीपटू मनिंदर सिंगने असेही सांगितले की, दाऊद प्रत्येक सामन्यातच नव्हे तर तेथे आयोजित प्रत्येक पार्टीतही उपस्थित होता. मनिंदर म्हणाला की, त्यावेळी आम्हाला फिक्सिंगसारखे प्रकार माहित नव्हते आणि त्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये लोकांच्या येण्या-जाण्यावर बंधने नव्हती.